चैतन्य प्रेम

संत, सत्पुरुषांची वचनं म्हणजे जणू जीवनसूत्रंच असतात. आपल्या मनाला ती अंतर्मुख करतात. भानावर आणतात. आपल्या जीवनविषयक आकलनाचा आणि धारणेचा नव्यानं विचार करण्याची प्रेरणा देतात. जगण्यातील दु:खंच बऱ्याचदा आपल्याला संत-सत्पुरुषांकडे नेतात. अध्यात्माच्या मार्गावर आणतात. त्या दु:खांचे हे किती मोठे उपकार आहेत! पण दु:खानं बेभान झालेलं मन काही आत्मकल्याणासाठी, खरंखुरं आत्महित साधण्यासाठी संताकडे जात नाही! भौतिक जीवनातलं दु:ख दूर व्हावं, एवढाच माणसाचा हेतू असतो. या दु:खमुक्तीची हमी त्याला हवी असते आणि त्यासाठी भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ‘मध्यस्थ’ म्हणून तो संताकडे पाहात असतो. खरा संत हा ‘मध्यस्थ’च असतो.. आपल्याला विशुद्ध परमार्थाकडे नेण्यासाठी तो प्रपंच आणि परमार्थ याच्या मध्यावर उभा असतो. प्रपंच हा सुख-दु:खाचा आहे, परमार्थ आनंदाचा आहे. प्रपंच म्हणजे लाभ-हानी, कमावणं आणि गमावणं, परमार्थ म्हणजे अखंड परम प्राप्ती. प्रपंच म्हणजे ज्ञान-अज्ञानाचं मिश्रण, परमार्थ म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान. तेव्हा प्रपंचाच्या प्रभावात जगत असलेल्या आणि त्या प्रपंचातील दु:ख दूर करण्यासाठी आलेल्या माणसाला सदगुरू त्या दु:खप्रभावातून सोडवत अध्यात्माच्या व्यापक मार्गावर वळवत असतात. मेहेर बाबांकडे एक संस्थानिक स्त्री आली. तिची लग्न झालेली मुलगी बाळंतपणासाठी आली होती. ती सासरीही अतिशय लाडकी होती. पण माहेरी आली असतानाच ती आजारी पडली. रोग बळावला आणि त्यात तिचा अंत झाला. हा धक्का त्या महिलेला पचवता येत नव्हता. त्या दु:खात बुडून ती मेहेर बाबांकडे आली होती. तिचा हट्ट होता की, ती मुलगी जणू गेलेलीच नाही याप्रमाणे जशीच्या तशी तिच्या जीवनात परतेल, अशी ग्वाही बाबांनी द्यावी! बाबा म्हणाले, ‘‘ठीक आहे. ती मुलगी जशी होती तशीच तुला परत मिळेल. पण ती ज्या दिवशी स्वप्नात येईल तेव्हा मी ते करीन!’’ बाईला त्या ग्वाहीनं खूप आनंद झाला. बाबांच्या भक्तांना मात्र आश्चर्यच वाटलं. कारण ही ग्वाही निसर्गनियमाच्या विरुद्ध होती. ती बाई मग नियमित बाबांकडे येऊ लागली. बाबांच्या सत्संगात तिचं मन रमू लागलं. बाबा अधेमधे तिला विचारत, ‘‘मुलगी स्वप्नात आली का?’’ बाई म्हणत असे, ‘‘नाही!’’ अनेक महिने गेल्यावर अचानक बाबा त्या बाईंना म्हणाले, ‘‘आज मी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. तुमची मुलगी तुमच्या स्वप्नात आली नसली तरी मी तिला जशीच्या तशी तुमच्या जीवनात आणणार आहे. फक्त एक अट आहे. एक तर ती तुम्हाला मिळेल किंवा मी! ती मिळाली, तर माझी भेट पुन्हा नाही. आता तुम्हीच निवड करा!’’ ती बाई मेहेर बाबांना म्हणाली, ‘‘नाही बाबा. तुम्ही जीवनात असणं हीच खरी भाग्याची गोष्ट आहे. तिचा मृत्यू तिच्या प्रारब्धानं झाला. तो कसा बदलता येईल?’’ काही महिन्यापूर्वी बाबांनी ‘तुमची मुलगी जशीच्या तशी तुमच्या जीवनात परत येईल,’ अशी ग्वाही त्या बाईला दिल्यानं ज्या भक्तांच्या मनात विकल्प आला होता त्यांनाही जाणवलं की, त्या बाईला दु:खप्रभावातून सोडविण्याची प्रक्रिया त्या ग्वाहीबरोबरच सुरू झाली होती! तेव्हा दु:खातून मुक्त होण्याच्या इच्छेनं जवळ आलेल्या जीवाला खरे संत-सत्पुरुष सुखाची ग्वाही देतात. पण त्या ग्वाहीबरोबरच दु:खाच्या प्रभावातून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होते! मग दु:खाचं कारण उरलं असलं तरी ते सलत नाही.