चैतन्य प्रेम

रात्रीचे बारा वाजून गेले होते. एक मित्र बोरीबंदरला (तेव्हाचं नाव व्ही.टी.) रेल्वे मुख्यालयात कामाला होता. त्याची रात्रपाळी संपली होती आणि आम्ही एकत्र निघणार होतो. त्याला दुसऱ्या विभागातील त्याच्या सहकारी मित्राला काही तरी निरोप द्यायचा होता म्हणून मीही त्याच्याबरोबर गेलो. दारावर पाटी होती ‘परिचालन विभाग’! आत गेलो तर मोठय़ा चौकोनी कार्यालयात कित्येक जण बसले होते. प्रत्येकासमोर मोठा फलकवजा तक्ता होता आणि त्यावर कागदाचे ताव टोचले होते. रेल्वेच्या अंतर्गत दूरध्वनी यंत्रणेद्वारे प्रत्येकजण अधेमधे काही बोलत होता आणि समोरच्या कागदावर पेन्सिलने काही नोंदी होत तर काही ठिकाणी काट मारली जात होती. एकतर इतक्या रात्री इतके कर्मचारी या विभागात कलकलाटात काम करीत असतील, याची कल्पना बाहेरून आली नव्हती. त्यामुळे मला जरा आश्चर्यच वाटलं होतं. त्यात क्षणोक्षणी कागदावर सुरू असलेल्या नोंदी आणि काटछाट पाहूनही मला नवल वाटलं होतं. मी विचारलं, ‘हे काय काम सुरू आहे?’ मित्र म्हणाला, ‘मुंबई विभागातल्या बोरीबंदरपासून कामण, लोणावळा आणि इगतपुरीपर्यंतच्या प्रत्येक लांब पल्लय़ाच्या आणि उपनगरी गाडीच्या प्रवासावर लक्ष ठेवलं जात आहे!’ म्हणजे प्रत्येक कर्मचारी एकेका गाडीवर नजर ठेवून होता. गाडीनं मुंबई विभागांची हद्द ओलांडली की पुढच्या विभागांवर त्या गाडीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपोआप हस्तांतरित होणार होती. याप्रमाणे प्रत्येक गाडी मुक्कामाला पोहोचेपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवलं जातं! मित्र म्हणाला, ‘बघ आणि कुठे आडवाटेला गाडी थांबली असली की प्रवासी रेल्वेच्या नावानं शिव्या घालायला सुरुवात करतात की, काय हे इथे गाडी रखडली आहे त्याची कुणाला खबर तरी आहे का? पण प्रत्येक गाडीकडे, तिच्या मार्गातल्या अडचणीकडे लक्ष ठेवलं जात असतं.’ ते दृश्य पाहून माझ्या मनात आलं की खरंच, ही तर साधी माणसाची यंत्रणा! पण जसं प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवलं जातं तसंच या जगातल्या प्रत्येक जीवाकडेही परमेश्वराचं लक्ष आहेच! जीवाला वाटतं की तो अडचणीत आहे, संकटात आहे, पण खरंच देव म्हणून काही आहे की नाही? तर भगवंताचं प्रत्येक जीवाकडे लक्ष असतंच. आता याचा अर्थ असा नव्हे की जीव दु:ख, हालअपेष्टा भोगत नाही, परिस्थितीचे चटके सोसत नाही. ते तो सोसतोच. पण मानवनिर्मित ‘परिचालन’ यंत्रणा आणि ईश्वरनिर्मित सृष्टीची ‘परिचालन’ यंत्रणा; यात थोडा फरक आहे. मानवनिर्मित परिचालन यंत्रणेत प्रत्येक गाडीकडे लक्ष दिलं जातं आणि गाडीच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक पावलंही उचलली जातात, तीच रीत भगवंताच्या परिचालन यंत्रणेतही असते, पण एकच भेद वा फरक असतो तो हा की जीवालाही भगवंताकडे लक्ष द्यावं लागतं! जीवाच्या जीवनातील दु:खं दूर होण्यासाठी भगवंत आवश्यक पावलं उचलतो, पण जीवाचं लक्ष भगवंतकेंद्रित नसेल, तर त्या अडचणीतून बाहेर काढणारा मार्ग दिसत असूनही त्याला तो दिसत नाही! भ्रम, मोह, आसक्तीचं दाट धुकं त्या मार्गावर पसरलेलं असतं. मग तो चुकीच्या मार्गानी, अडचणीतून बाहेर पडण्याची धडपड करीत राहतो आणि आणखी अडचणीत सापडतो. जेव्हा त्याचं लक्ष खऱ्या अर्थानं भगवंताकडे जातं तेव्हा भगवंताचंही लक्ष आपल्याकडे आहे, हे समजतं. तो कसा सांभाळ करत आहे, हे जाणवू लागतं. मग खरा मार्ग उमगतो आणि खरी वाटचाल सुरू होऊ  शकते.