अणुभट्टय़ांची निर्मिती निसर्गाने पूर्वीच केली आहे. नैसर्गिक अणुभट्टय़ा अस्तित्वात असण्याची शक्यता १९५३ साली कॅलिफोर्निआ विद्यापीठातील जॉर्ज वेदरइल आणि शिकागो विद्यापीठातील मार्क इंघ्रॅम यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आर्कन्सो विद्यापीठातील पॉल कुरोदा यांनी या नैसर्गिक अणुभट्टीसंबंधीची गणितेही केली. कालांतराने अशा अणुभट्टय़ांचा शोध पश्चिम आफ्रिकेतल्या गॅबोन या देशातील ओक्लो येथील युरेनियमच्या खाणींत लागला. या खाणींत सापडलेल्या युरेनियमच्या काही नमुन्यांचे १९७२ साली विश्लेषण केले गेले. या युरेनियममध्ये विखंडन होणाऱ्या युरेनियमचे प्रमाण सर्वसाधारण युरेनियममधील प्रमाणापेक्षा कमी असल्याचे आढळले. युरेनियमच्या विखंडनात निर्माण होणारी सुमारे तीसाहून अधिक मूलद्रव्येही या परिसरात आढळली. फ्रेंच संशोधक फ्रान्सिस पेरिन याने या सर्व पुराव्यावरून प्राचीन काळी इथे नैसर्गिक अणुविखंडन घडून गेल्याचे ओळखले.

नैसर्गिक अणुविखंडन होऊन गेलेल्या अशा एकूण १४ जागा ओक्लो इथे आढळल्या. सुमारे दहा-दहा मीटर लांबीरुंदीच्या थरांच्या स्वरूपातील या ‘अणुभट्टय़ा’ जमिनीच्या पृष्ठभागापासून १२ ते ५०० मीटर अशा वेगवेगळ्या खोलीवर वसल्या आहेत. या अणुभट्टय़ा दोन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाल्या होत्या व त्या सुमारे आठ लाख वर्षे सक्रीय होत्या. त्यांत एकूण सहा टन युरेनियमचे विखंडन झाले असावे व दोन टन प्लूटोनियमची निर्मिती झाली असावी. विखंडनातील ऊर्जानिर्मितीमुळे इथले तापमान ४०० ते ६०० अंश सेल्सियसपर्यंत वर गेले असावे. मात्र थांबतथांबत चालणाऱ्या या १४ अणुभट्टय़ांची एकत्रित शक्ती ही शास्त्रज्ञांच्या मते सुमारे १०० किलोवॅट इतकी माफक असावी.

युरेनियममधील सहजपणे विखंडन होणारे अणू हे २३५ अणुभार असलेले अणू आहेत. दोन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील युरेनियममधील या विखंडनशील युरेनियमचे प्रमाण ३.५ टक्के होते. विखंडनशील युरेनियमच्या इतक्या मोठय़ा प्रमाणामुळे हे विखंडन घडून येणे शक्य झाले. किरणोत्सारी ऱ्हासामुळे आज हे प्रमाण ०.७ टक्क्यांवर आले आहे. अशी विखंडनक्रिया नैसर्गिकरीत्या घडून येण्यास युरेनियममधील या अणूंचे प्रमाण किमान एक टक्का असावे लागते. त्यामुळे अशा अणुभट्टय़ा निर्माण होण्याची शक्यता एक अब्ज वर्षांपूर्वीच मावळली आहे. परंतु भूतकाळात अशा अणुभट्टय़ा इतर ठिकाणीही निर्माण झाल्या असतील. भूगर्भीय हालचालींत नष्ट झालेल्या नसल्यास, अशा आणखी अणुभट्टय़ांचा पुढेमागे शोधही लागू शकेल.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org