राजकीय नेत्यांनी सारी पदे आपल्याच घरात राहावीत या उद्देशाने मुले, मुली, सूना यांना राजकारणात पुढे आणले. एकाच घरातील दोन-तीन जण सक्रिय झाले आणि त्यातून स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक नेत्याच्या मुलाला किंवा मुलीला आपणच राजकीय वारस व्हावे, असे वाटू लागले. मनासारखे न झाल्यास दुसऱ्या पक्षाचा पर्याय उपलब्ध असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, करुणानिधी, मुलायमसिंग यादव, प्रकाशसिंग बादल आदी नेत्यांची मुले किंवा पुतण्यांमध्ये फाटाफूट झाली. आता या यादीत लालूप्रसाद यादव यांची भर पडली. चारा घोटाळाप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या लालू यांची पत्नी, मुलगी आणि दोन्ही मुलगे सारेच राजकारणात सक्रिय आहेत. दोन मुलांमध्ये राजकीय वारशावरून स्पर्धा सुरू झाली. धाकटे तेजस्वी हे लालूंचे राजकीय वारस. यामुळे थोरले तेज प्रताप दुखावले गेले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरविताना धाकटय़ा भावाने आपल्याला विश्वासात घेतले नाही याचा थोरल्याला जास्त संताप. पक्ष सोडण्याचा इशारा दिला, पण त्याचाही उपयोग झाला नाही. तुरुंगात असलेल्या लालूंनी बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या मुलाला खडसावले. यामुळे पक्ष सोडण्याचा विचार सोडून त्याने ‘लालू-रबडी मोर्चा’ ही संघटना काढली. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात तेज प्रताप याने रोड शोमध्ये भाग घेतला. थोरल्याच्या उद्योगाची धाकटय़ाकडून फारशी दखलच घेतली जात नाही. मामा आणि कुख्यात साधू यादव हे भाच्याला प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जाते. कारण एकेकाळी साधू यादव याचे राष्ट्रीय जनता दलात प्रस्थ होते. आता कोणी विचारत नसल्याचे त्यांना दु:ख आहे. या कौटुंबिक  वादात पक्षाचे मात्र नुकसान होत आहे.