पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने आपला कौल पुन्हा एकदा ममतांच्या पारड्यात टाकलाय. या विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनीही मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ममतांचा उल्लेख वाघीण असा करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. इतकच नाही तर राऊत यांनी ट्विटरवरुनही ममतांसोबतचा फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे मोदींना डिवचलं आहे. मात्र या ट्विटवरुन एका भाजपा नेत्याने प्रतिक्रिया देत राऊत यांना टोला लगावलाय.
“एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्ध्वस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं प्रसारमाध्यमांसमोर कौतुक केलं आहे. त्यानंतर ट्विटरवरही “बंगालच्या वाघीणीचे अभिनंदन… ओ दीदी… दीदी ओ दीदी…” असं ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये ममतांवर टीका करताना त्यांचा उल्लेख, “दीदी ओ दीदी” असा करायचे. हाच उल्लेख करत राऊत यांनी ममतांसोबतचा जुना फोटो ट्विट करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात.
Congratulations Tigress of Bengal..
ओ दीदी,
दीदी ओ दीदी!
@MamataOfficial @derekobrienmp @MahuaMoitra pic.twitter.com/orDkTAuPr3— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2021
राऊत यांच्या या ट्विटवर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच सुरतमधील माजुरा येथील आमदार असणाऱ्या हर्ष सांघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांचं ट्विट कोट करुन रिट्विट करताना त्यांनी राऊतांना, “बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना”, असं म्हणत टोला लगावला आहे. आपला ज्या गोष्टीच्या जडघडणीमध्ये काडीचाही सहभाग नाही अशा गोष्टींसाठी आनंद व्यक्त करणाऱ्या व्यक्तीसाठी हिंदीमध्ये, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना हा वाक्यप्रचार वापरला जातो.
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना!! https://t.co/NKdf9iNCpp
— Harsh Sanghavi (@sanghaviharsh) May 2, 2021
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देशात करोनाचं सकंट असतानाही प्रोटोकॉल तोडून रोड शो, रॅली, शक्तीप्रदर्शन होत होतं. सगळा देश करोनाशी लढत असताना तिथे भाजपा ममतांचा पराभव करण्यासाठी लढत होता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या बदल्यात तुम्ही त्यांना करोना दिला आहे,” असा टोलाही प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.