‘चौकीदार चोर है’ हे वाक्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राफेल संबंधीच्या निर्णयावर केलेल्या वक्तव्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राहुल गांधी यांना अवमानना नोटीस बजावली आहे. राहुल गांधींनी चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध जोडला असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

राफेल निकालाविरोधात प्रलंबित असलेल्या फेरविचार याचिका आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेवर ३० एप्रिलला एकत्रित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेली मानहानी याचिका रद्द करावी ही राहुल गांधी यांची मागणी सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली.

राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या वातावरणात मी आवेशात विधान केले होते आणि विरोधकांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. मी निवडणुकीच्या वातावरणात आवेशात विधान केले होते आणि माझ्या राजकीय विरोधकांनी त्या विधानाचा विपर्यास करत गैरसमज पसरवले. राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर है, असे विधान केल्याचे विरोधकांनी पसरवले होते. मी असा विचार कधी केलाही नव्हता, असे त्यांनी सांगितले. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले.