देशात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत एक वेगळं वातावरण असल्याने भाजपला यश मिळाले. पण त्या निवडणुकीत विलासराव देशमुख असते. तर काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले असते आणि राज्याच नेतृत्व देखील विलासरावांनी केले असते असं मत विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार उल्हास पवार यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा देखील दिला.

यावेळी उल्हास पवार म्हणाले की, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे कार्यकर्ता आपलासा करण्याचे एक वेगळं कौशल्य होते. त्यांना एकदा कार्यकर्ता भेटला की त्यांच्यापासून कधी दूर गेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात विलासरावांनी कार्यकर्ते तयार केले. आज या निवडणुकीच्या काळात आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण निवडणुकीच्या काळात राज्यभरात त्यांच्या अनेक भागात सभा व्हायच्या. तेव्हा हजारो लाखोंच्या सभा मी स्वतः पाहिल्या असून एकदा सभा ठिकाणी आलेला माणूस किंवा कार्यकर्ता विलासरावांचे भाषण सुरू झाल्यावर उठून जात नव्हता.

तसेच त्यांच्यामध्ये भाषण करण्याची एक पद्धत होती. अनेक उदाहरणे आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडायच्या. यामुळे पक्षातील आणि विरोधी बाकावरील नेते मंडळी त्यांचे कायम मित्र राहिले. हे केवळ त्यांच्या स्वभाव गुणामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की, विलासराव देशमुख असते तर राज्यात एक वेगळं चित्र पाहण्यास मिळालं असतं.

२०१४ साली राज्याची सत्ता काँग्रेसच्या हाती असती आणि त्याचे नेतृत्व विलासराव देशमुख यांनीच केले असते. काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले असते अशी भूमिका त्यांनी मांडली. उल्हास पवार हे विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगताना भावूक झाल्याचे पहावयास मिळाले.