शरद पवार मोहिते-पाटलांवर गरजले

देशातील आणि जगातील दहशतवाद आपणांस माहीत आहे. माळशिरस तालुक्यात देखील गल्ली-बोळात दहशतवाद आहे. परंतु माळशिरसच्या जनतेने घाबरण्याचे कारण नाही. माळशिरसची जबाबदारी मी घेतली आहे, अशा कठोर शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याचा समाचार घेतला. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये खुशाल जावे. पण अर्धी चड्डी घालू नये, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.

माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपुते येथे पवार यांची जाहीर सभा झाली. राष्ट्रवादीपासून दुरावत भाजपशी घरोबा केलेले मातबर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नातेपुते येथे झालेल्या या जाहीर सभेत पवार हे काय बोलतात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर खास शैलीत टीकास्त्र सोडले.

पवार म्हणाले, की शेतक ऱ्यांनी आपल्या उसाच्या देयकांबद्दल विचारणा केल्यावर त्यांना धमकावणे हा दहशतवादच आहे. परंतु हा दहशतवाद चालणार नाही. मी माळशिरस तालुक्यावर लक्ष ठेवून आहे. आम्ही विजयसिंहांना काहीच कमी पडू दिले नाही. बांधकाममंत्री, पाटबंधारेमंत्री, ग्रामविकासमंत्री, पर्यटनमंत्री ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांना संधी दिली. साखर संघाचे अध्यक्षही केले. ९० टक्के आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले होते. परंतु तरी देखील आम्ही विजयसिंहांना संधी दिली. इतकी पदे भोगताना कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावणे त्यांना का सुचले नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित करीत मोहिते-पाटील यांची खिल्ली उडविली.

सध्या जाईल तेथे त्यांचे ‘स्थिरीकरण’ चालू आहे. मात्र ‘अंदर की बात’ काही वेगळी आहे. त्यांना त्याच्या पुत्राला संधी हवी होती. आम्ही ते देखील केले. मात्र त्यांच्या पुढच्या पिढीने वेगळेच उद्योग करून ठेवले. म्हणून आम्ही त्यांना बाजूला केले. आम्हाला रणजितसिंह मोहिते-पाटील यांना स्वीकारणे कठीण होते.