मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांमधील वक्तव्याला आणि ध्वनिचित्रफितींना भाजप तशाच प्रकारे उत्तर देणार असल्याने निवडणूक आयोगाने तपासून मगच ते दाखवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आयोगाकडे केली आहे.

राज ठाकरे यांच्या आरोपांना भाजपतर्फे येत्या शनिवारी, २७ एप्रिल रोजी उत्तर दिले जाणार आहे. मनसेच्याच खास ध्वनिचित्रफीत शैलीत उत्तर दिले जाणार असल्याचे विनोद तावडे यांनी जाहीर केले होते. मात्र आता त्याला मिलिंद देवरा यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे उत्तर प्रचार संपल्यानंतर छापून येणार असल्यामुळे त्यावर कोणालाही आपले म्हणणे मांडता येणार नाही. त्यामुळे भाजपतर्फे जे व्हिडीओ दाखवले जाणार आहेत ते निवडणूक आयोगाने तपासून बघावेत, अशी मागणी देवरा यांनी केली आहे.

दक्षिण मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या देवरा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ही मागणी केली आहे.