समाजवादी पक्षाने ईव्हीएममधील बिघाडावरुन मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. “देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी ईव्हीएममधून भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा गंभीर प्रकार असून निवडणूक प्रक्रियेवर खर्च केले जाणारे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेले”, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील दहा जागांवर मंगळवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांमध्ये सकाळी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला. “देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या किंवा भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने या तक्रारी समोर येत आहेत. जवळपास ३५० हून अधिक ईव्हीएम बदलण्यात आले आहे. हा निष्काळजीपणा असून हे फौजदारी स्वरुपाचे कृत्य आहे”, असा आरोप त्यांनी केला. यानिष्काळजीपणामुळे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचेही त्यांनी सांगितले.

अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यांनी मंगळवारी दुपारी सैफईत मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला खान यांनी देखील भाजपावर आरोप केले आहे. काही ठिकाणी पोलीस मतदारांना धमकी देत आहेत, तर जिल्हाधिकारीही सत्ताधाऱ्यांना मदत करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evms voting for the bjp alleges sp leader akhilesh yadav
First published on: 23-04-2019 at 12:53 IST