करोनाचा संसर्ग झाल्याने तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील उमेदावर काजल सिन्हा यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणामध्ये काजल यांच्या पत्नी नंदिता यांनी बुधवारी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुदीप जैन यांच्याबरोबरच निवडणुक आयोगातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केलीय. नंदिता यांनी निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप करताना करोना कालावधीमध्ये उमेदवार आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात आयोगाने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप नंदिता यांनी केल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या काजल यांचा रविवारी (२५ एप्रिल २०२१ रोजी) मृत्यू झाला. काजल यांना करोनाचा संसर्ग झाला होता आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने एकूण तीन उमेदवारांचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी, तृणमूलचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यासोबत सहा उमेदवारांना करोनाची लागण झाली आहे. काही काळापूर्वी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. शशी पांजा आणि साधन पांडे यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काजल यांना श्रद्धांजली अर्पण केली असून काजल यांच्या मृत्यूचं वृत्त ऐकून धक्का बसल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे १६ हजार ४०३ नवे करोना रुग्ण आढळून आलेत. राज्यातील करोनाबाधितांची संख्या सात लाख ७६ हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी राज्यात ७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ११ हजार ८२ वर पोहचलीय.