ऋषिकेश मुळे

शिवसैनिकांची नाराजी मतदान यंत्रांपासून दूर; भिवंडीच्या ग्रामीण भागातूनही चांगले मताधिक्य

निवडणुकीपूर्वी भाजपसाठी धोक्याचा मतदारसंघ म्हणून चर्चिल्या गेलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील यांनी गतवेळेपेक्षा अधिक, १ लाख ५६ हजार ३२९ इतक्या मताधिक्यासह विजय नोंदवला. पाटील यांच्याविषयी शिवसेनेत असलेली नाराजी, काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी दिलेली टक्कर आणि मुस्लीमबहुल भाग या कारणांमुळे भाजपची ही जागा जाणार, असे बोलले जात होते. मात्र, भाजपचे आमदार असलेल्या कल्याण पश्चिम आणि मुरबाड या दोन विधानसभा मतदारसंघांतून पाटील यांनी मिळवलेले सव्वा लाखांचे मताधिक्यच निर्णायक ठरले. विशेष म्हणजे, कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या गटानेही पाटील यांच्याविषयीची नाराजी मतदान यंत्रांतून प्रदर्शित केली नाही.

शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी गेल्या चार वर्षांत न सोडणारे भाजपचे भिवंडीतील खासदार कपिल पाटील यांनी कल्याण आणि बदलापूर येथील प्रचारादरम्यान झालेल्या युतीच्या मेळाव्यात शिवसेनेसमोर अक्षरश: हात जोडले होते. या वेळी ‘युती तुटल्यामुळे अनवधानाने मी कुणाला दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काळात माझ्या चुका सुधारेन,’ असे सांगत पाटील यांनी भर सभेत शिवसैनिकांकडे दिलगिरी व्यक्त केली होती. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही पाटील यांच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ देत पक्षातील कार्यकर्त्यांना पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले होते. याचा एकत्रित परिणाम पाटील यांच्या विजयातून स्पष्ट दिसून आला. कल्याण पश्चिम आणि बदलापूर या शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या भागांतून पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले. कल्याण पश्चिममधील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी पाटील यांच्यासाठी केलेली मोर्चेबांधणी यशस्वी झाली, तर भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातूनही पाटील यांनी ६० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवले.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पाटील यांनी जवळपास ५७८९२ मताधिक्य मिळवले. कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या या भागात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी युतीला जाहीर केलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. शहापूर येथील समस्या सोडवण्यासाठी खासदार कपिल पाटील हे प्रयत्नशील असतील, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्यामुळे त्यांना मतदानात पाठिंबा देण्यात आल्याचे श्रमजीवी संघटनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शहापूर येथून १४ हजार ३८७ मतांनी कपिल पाटील यांनी मताधिक्य मिळवले.

भिवंडीचा शहरी भाग मात्र नाराज

भिवंडी शहरातील मतदार मात्र, कपिल पाटील यांच्यावर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भिवंडी पश्चिमेतून कपिल पाटील यांनी ५२ हजार ८५६ मते मिळवली, तर सुरेश टावरे यांनी ७८ हजार ३७६ मते मिळवत २५ हजार ५२० मतांचे मताधिक्य मिळवले. भिवंडी पूर्वेतूनदेखील कपिल पाटील यांनी ४७ हजार ०१८ मते मिळवली, तर सुरेश टावरे यांनी ७० हजार ८२५ मते मिळवत २३ हजार ८०७ मताधिक्य मिळवले. शहरी भागातील मुस्लीम लोकसंख्या मोठी आहे. त्याचाच फटका पाटील यांना बसला असण्याची शक्यता आहे.