पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचारसभेत पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मोदी इतरांच्या घरात डोकवतात. पण त्यांच्या घरात कोणी आहे की नाही, हेच देशाला माहीत नाही,’ असा टोला पवार यांनी लगावला. ते इंदापूर येथे बोलत होते.
पवार म्हणाले की, ‘वर्धा येथील सभेत म्हणजे इथून ६५० ते ७०० किमी दूर अंतरावर असलेल्या ठिकाणावरुन त्यांनी माझ्यावर व माझ्या कुटुंबीयांवर टीका केली. पवार यांच्या घरात भांडणं आहेत असे ते म्हणाले. माझ्या घरात भांडणं आहेत, हे यांना कसं समजलं. आम्ही सर्व जीवाभावानं एकत्र असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्यात भांडणं कसली. मी भेटल्यावर त्यांना सांगेन, मोदीसाहेब अहो आमचं घर भरलेलं आहे. ज्याच्या घरात कोणी आहे की नाही हेच देशाला माहीत नाही, त्यांनी आमच्यावर टीका करु नये,’ असेही ते म्हणाले.
मोदी यांनी पवार कुटुंबीयांत वाद सुरू असल्याचे जाहीर सभेत म्हटले होते. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनीही जाहीर सभेत उत्तर दिले होते. त्यानंतर इंदापूर येथे माध्यमांशी बोलताना पवार यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 5:33 pm