१६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. १६ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. निवडणूकीची तयारी पुर्ण झाली असून मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात होणार आहे.

जिल्ह्यातील १६ लाख ५१ हजार ५६०  मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात यामध्ये  ८ लाख ९ हजार ३४४ पुरुष मतदारांचा तर ८ लाख ४२ हजार २१३ महिला मतदारांचा समावेश आहे. विविध मतदान केंद्रांवर आज अलिबागहून सकाळपासून अधिकारी व कर्मचारी यांची पथके मतदान साहित्य घेऊन रवाना झाली. तर इतर ठिकाणांहून येथे कर्मचारी दाखल झाले. डॉ विजय सूर्यवंशी यांनीही आज सकाळी जेएसएम महाविद्यालायामागील प्रांगणात भेट देऊन स्वत: सर्व व्यवस्थेची खातरजमा करून घेतली तसेच कर्मचाऱ्यांशी  चर्चा केली.

एकूण २१७९  मतदान केंद्रांवर १ मतदान केंद्राध्यक्ष, १ प्रथम मतदान अधिकारी, २ इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. याशिवाय मतदानासाठी सहाय्य करणारे आशा, अंगणवाडी सेविका,पोलीस आणि इतर असे सुमारे १५ हजार कर्मचारी  देखील आपापल्या मतदान केंद्रांवर व निश्चित केलेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी मतदानाची वेळ आहे. अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवून मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.