स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार असलेले शाम शरण नेगी यांनी आपल्या आयुष्यातील १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. देशात आतापर्यंत झालेल्या सर्वच्यासर्व १७ लोकसभा निवडणुकीत नेगी यांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. वयाची शंभरीपार केलेले नेगी गेली ६८ वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे. नेगी हे निवृत्त शिक्षक असून ते किन्नूरमधील कलपा शहरामध्ये राहतात. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे यासाठी नेगी आग्रही आहेत. हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथे राहणारे नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदान करणाऱ्या १०० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या १ हजार ०११ मतदारांपैकी नेगी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने १९५२ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग होता. त्यातही पहिल्यांदाच मतदान असल्याने मतदानाला कोणीच उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी नेगी यांनी स्वतःच आपले मतदान केले आणि ते देशाचे पहिले मतदार ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर नेगी यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात फिरून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिली. नेगी यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election 2019 independent indias first voter shyam negi voying 17th time
First published on: 19-05-2019 at 15:00 IST