प्रवीण छेडा ‘मातोश्री’वर गेल्याने चर्चेला उधाण

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत अद्याप संभ्रम कायम असताना नुकतेच भाजपमध्ये घरवापसी झालेले नेते प्रवीण छेडा यांनी बुधवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली.

भाजपने राज्यातील बहुसंख्य उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असली तरी ईशान्य मुंबईचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेने आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येते. यामुळेच संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी अन्य नावाची शिफारस करण्याची सूचना राज्यातील भाजप नेत्यांना केली होती. सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतलेला नाही. सोमय्या हे पुन्हा उमेदवारी मिळेल यावर आशावादी आहेत. पण देशातील ३०० पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तरी या मतदारसंघाचा निर्णय संसदीय मंडळाने अद्यापही घेतलेला नाही.

गेल्याच आठवडय़ात घाटकोपरमधील प्रवीण छेडा यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. छेडा हे पूर्वी भाजपचे नगरसेवक होते. प्रकाश मेहता यांच्याशी बिनसल्याने ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे पालिकेचे विरोधी पक्षनेतेपद होते. छेडा भाजपमध्ये परतल्याने सोमय्या यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच छेडा हे आज ‘मातोश्री’वर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली. छेडा यांना भाजप नेत्यांनी पाठविले होते की, काही वैयक्तिक कामसााठी गेले होते हे स्पष्ट झाले नाही.