|| महेश सरलष्कर
‘रामजन्मभूमी न्यास’चे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांचा विश्वास
- राम मंदिर कधी उभे राहणार?
– मंदिर कधी उभे राहील हे काळच ठरवेल. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य काळ लागतो. केंद्रात आणि राज्यात मोदी-योगींचे सरकार आहे. राम मंदिर उभारणीचा काळ समीप आला आहे. नजीकच्या काळात राम मंदिर उभे राहू शकेल.
- भाजपच्या संकल्पपत्रात राम मंदिराचा मुद्दा असला तरी मोदी सरकार त्यासाठी फारसे प्रयत्न करताना दिसत नाही..
– मोदींवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मोदींच्या कार्यकाळात राम मंदिर उभे राहू शकते. त्यामुळे चिंता करण्याजोगी कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नाही. मंदिर उभारणीचे काम अयोध्येतील कार्यशाळेत सुरू आहे.
- बहुमत असतानाही केंद्र सरकारने गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत, असा आरोप होत आहे..
– काळ-वेळ बघून केंद्र सरकार निर्णय घेईल.
- मोदींवर कोणाचा दबाव आहे, असे वाटते का?
– अजिबात नाही. त्यांनी कोणाला घाबरण्याचे कारण नाही.
- संसदेत कायदा करण्याबाबतही हालचाली केलेल्या नाहीत..
– राम मंदिर उभारणीच्या विविध पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो त्यापैकी संसदेत कायदा करण्याचा मार्ग खुला आहे. राम मंदिराच्या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखून, त्यांच्या सहमतीने राम मंदिराची उभारणी केली जाईल.
- मोदी अयोध्येला आले नाहीत याबद्दल नाराजी आहे..
– कोणीही नाराजी बाळगू नये. मोदींचा अयोध्येला येण्याचा कार्यक्रम ठरलेला नव्हता. ते प्रचारासाठी शेजारच्या गावात येणार होते. शिवाय, त्यांची सुरक्षा वगैरे अनके मुद्दे असतात.