मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना पराभवचा धक्का बसला आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत. श्रीरंग बारणे यांचा तब्बल दोन लाख 15 हजार 913 मतांनी विजय झाला आहे. मावळमध्ये पार्थ पवरांना 503375 मते मिळाली आहेत. तर विजयी खासदार बारणे यांना 718950 मते मिळाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकूण मतांच्या ५२.६५ टक्के मते बारणेंना मिळाली आहेत. तर पार्थ पवार यांना 36.87 टक्के मते मिळाली आहेत. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदार संघातील लढत राज्यभर चर्चेत होती. अजित पवार यांनी स्वत प्रचारात लक्ष घातले होते. मात्र, पवारांच्या पार्थला राजकीय चक्रव्यूह भेदण्यात अपयश आले आहे.

गेल्या दोन निवडणुकांत मावळ मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व आहे. यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या मतदार संघात काय निकाल लागतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, नवख्या पार्थ पवारांना पहिल्याच निवडणुकीत पराभवांचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी दिली होती.

प्रसारमाध्यमांकडून भरघोस प्रसिद्धी मिळवूनही पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत अपयशी का ठरले याची काही कारणं सांगता येतील.

१) मतदार संघाची माहिती नसलेला आणि केवळ शरद पवार यांचा नातू आणि अजित पवार यांचा मुलगा येवढीच ओळख

२) पिंपरी-चिंचवड किंवा मावळ लोकसभा मतदार संघात यापूर्वी संपर्क नाही

३) प्रचारात प्रभाव पाडता आला नाही

४)राष्ट्रवादी पक्षातील गटा-तटाची एकजूट होऊन ही त्याच परिवर्तन मतात करता आला नाही

५) वंचित बहुजन चे उमेदवार राजाराम पाटील यांना मिळालेल्या मतांचा फटका बसला

६) पार्थ हे तरुण असुनही त्यांना युवकांची मत वळवण्यात अपयश आले

मात्र दुसरीकडे प्रचारामध्ये फारसा जोर नसतानाही श्रीरंग बारणे यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. बारणे यांच्या विजयाची काही कारणं सांगता येतील.

१) श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन

२)श्रीरंग बारणे यांची ५ वर्ष झालं मतदार संघावरील मजबूत पकड,परिसरातील प्रश्न माहीत होते,घरोघरी नाव पोहचलेल होतं

३) श्रीरंग बारणे यांना स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता तो मावळला

४) शिवसेना-भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र प्रचार केला.त्याचा फायदा बारणे यांना झाला

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election ncp parth pawar vs srirang barane mawal constituency lok sabha election
First published on: 23-05-2019 at 10:30 IST