निवडणूक निकालाविषयी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया

नाशिक : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळविले. मोदींचा करिश्मा आजही कायम असल्याचे निकालातून दिसून येत असल्याची भावना शहरातील विविध क्षेत्रांतील मतदारांनी व्यक्त केली. विजेत्यांनी आश्वासनांचा विसर पडू न देता विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

हिंदुत्वाच्या बाजूने दिलेला कौल

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा हिंदुत्वाच्या बाजूने दिलेला कौल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडून जनतेच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. जीएसटी, नोटाबंदीसारख्या निर्णयावर आगपाखड होत असताना निकालानंतर हे निर्णय लोकांच्या पसंतीस उतरल्याचे लक्षात येते. पाच वर्षांत सरकारने जी आश्वासने दिली, त्याची फलश्रुती होण्यासाठी जनतेने पक्षाला एक संधी दिली आहे. जनतेला दिलेला कौल राज्य तसेच केंद्र स्तरावर महत्त्वाचा असून भारत महासत्तेच्या दिशेने जाईल असे वाटते. आयुर्वेद आणि योगा यास भविष्यात वैश्विक पातळीवर वेगळी झालर मिळेल असा विश्वास वाटतो.

– वैद्य विक्रांत जाधव

शेतमालास भाव मिळावा

आमच्या शेतमालाला भाव नाही. आधीच पिकाला भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना दुष्काळाने त्यात भर घातली आहे. निकालाविषयी आम्ही काय बोलणार? काही चुकलं नाही, सारं बरोबर आहे. येत्या काळात शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, शेतमालाला भाव मिळावा ही अपेक्षा.

– दिनकर भोर (शेतकरी)

आश्वासनांची आठवण ठेवा

यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल बहुमताने भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने लागले असून मोदी लाट अजूनही कायम आहे. निकाल हा जनतेचा कौल असल्याने जनतेच्या अपेक्षा आगामी सरकारने पूर्ण कराव्यात. यशाने हुरळून न जाता आपली आश्वासने, जाहीरनामे यांचा विसर पडू देऊ नये. पराभूत पक्षांनी आत्मपरीक्षण करून येत्या काळात विरोधी पक्ष म्हणून सरकारवर वचक ठेवावा.

– प्राजक्ता नागपुरे (विद्यार्थिनी)

शेतीच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून आनंद वाटतो. देशाला स्थिर सरकार मिळाले आहे. मोदींसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज देशाला होती. पाच वर्षे त्यांनी काम केले. पण आता शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजांसाठी काम करावे. आजही शेतीला पाणी असेल, तर वीज नाही, भांडवल नाही, अशी स्थिती आहे. कर्जमाफीचे गाजर दाखविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतमालाचा खर्च वजा जाता चार पैसे त्याच्या खिशात खुळखुळतील याचा विचार करावा. जेणेकरून सणाचे चार दिवस तो इतरांप्रमाणे आनंदाने साजरे करू शकतो. कर्जाच्या खाईत लोटण्यापेक्षा त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

– बंडू शिंदे (शेतकरी)

मोदी करिश्मा कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम असल्याचे निकालावरून दिसते. पक्षाला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. या संधीतून देशाचा, राज्याचा विकास करावा हीच इच्छा. बेरोजगारीची आकडेवारी पाहता स्टार्ट अप, मेक इनसारख्या संकल्पना मांडण्यात आल्या, त्यांना बळकटी येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना तंत्रज्ञानापासून कायद्यापर्यंत काय करता येईल याचा विचार व्हावा. वाढलेली महागाई नियंत्रणात आणावी ही माफक अपेक्षा.

– मृणाल अध्यापक (नोकरदार)