अनेक कलाकारांकडे नागरिकत्वच नाही

गेल्या काही दिवसांपासून  बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार राजकीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत. विविध माध्यमांतून ते देशभरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही करत आहेत. मात्र, इतरांना हक्क बजावण्याचा सल्ला देणाऱ्या या कलाकारांपैकी अनेकजण स्वतच हा हक्क बजावण्यास अपात्र आहे.

यात एअरलिफ्ट, गोल्ड, केसरी सारखे देशभक्तीपर चित्रपट करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अनेकदा बॉलीवूडची कलाकार परदेशात चित्रीकरण करत असतील तर ते मतदानापासून दूर राहिल्याचे किस्से घडले आहेत. मात्र सध्या काही आघाडीचे कलाकार त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नसल्याने मतदान करू शकणार नसल्याचे उघड झाले आहे.

गेल्या दोन वर्षांत टॉयलेट एक प्रेमकथासारख्या सरकारी सामाजिक योजनांचे महत्त्व पटवून देणारा, लागोपाठ देशभक्तीपर चित्रपटांतून काम करणारा अभिनेता अक्षय कुमार स्वत:च मतदानापासून वंचित राहणार आहे. अक्षय स्वत: भारताचा नागरिक राहिला नसल्याने त्याला मतदानाचा हक्कच नाही. अक्षय कुमारला कॅनडाने आपले नागरिकत्व देऊ केले होते, मात्र भारतीय कायद्यानुसार त्याला एकाचवेळी दोन देशांचे नागरिकत्व मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने इथल्या नागरिकत्वावर पाणी सोडले. सध्या तो कॅनडाचा नागरिक आहे.

अन्य कलाकार

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे बाहेरच्या देशांमधून येथे आले आहेत. तेही इथले नागरिक नसल्याने त्यांनाही मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफचे वडील काश्मिरी होते मात्र तिचा जन्म हॉँगकाँगमधील असून ती ब्रिटीश नागरिक आहे. जॅकलिन फर्नाडिस

श्रीलंकेतून इथे आली आहे. तर अभिनेत्री नर्गिस फाखरी अर्धी झेक आणि अर्धी पाकिस्तानी असल्याने तिचाही भारताशी संबंध नाही. पॉर्न स्टार म्हणून इथे आलेली आणि प्रसिध्द झालेली अभिनेत्री सनी लिऑनही कॅनेडियन नागरिक असल्याने तिलाही इथे मतदानाचा हक्क नाही.