पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकींसाठीचे रणशींग आज मेरठ येथे घेतलेल्या सभेमधून फुंकले. पुढील ४४ दिवसांमध्ये पंतप्रधान मोदी देशभरामध्ये १०० हून अधिक सभा घेणार असल्याचे समजते. आज मेरठ येथे त्यांनी घेतलेल्या पाहिल्याच सभेमध्ये काँग्रेसबरोबरच सर्वच विरोधीपक्षांचा मोदींने समाचार घेतला. या सभेला म्हणावी तितकी गर्दी झाली नाही असे फोटो व्हायरल होत आहेत. पहिल्या रांगेत भाजपा समर्थकांची गर्दी दिसत असली तरी मागच्या अनेक रांगामध्ये रिकाम्या खुर्च्याच होत्या अशा आक्षयाचे ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी रिट्वीट केले आहे. याच रिकाम्या खुर्च्यांच्या फोटोंवरुन आता मनसेने ‘मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत’ असं ट्विट केलं आहे.

भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मोदींने आज पहिली सभा घेतली. मोदींच्या या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली खरी मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगेत होती मात्र मागे खुर्च्या रिकाम्याच असल्याचे ट्विट माया मिरचंदानी यांनी केले. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘पहिल्या रांगेत समर्थकांची गर्दी तर मागे रिकाम्या खुर्चा, पहिल्या सभेसाठी मोदी मेरठमध्ये दाखल झाले तेव्हाचे चित्र.’

नक्की वाचा >> मोदींची पहिली सभा… पुढे समर्थकांची तर शेवटच्या रांगांमध्ये रिकाम्या खुर्च्यांची गर्दी

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने यासंदर्भातील बातमी दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरावरुन मोदींना लक्ष्य केले आहे. या बातमीचा स्क्रीनशॉर्ट मनसेने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, ‘मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं. मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत…मोदी सरकारने स्वतःच अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जनतेच्या लक्षात आला आहे,’ अशी टिका मनसेने केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यानंतर झालेल्या मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी या पुढील माझ्या सर्व सभा आणि भाषणे ही भाजपा, मोदी आणि शाह यांच्या विरोधातच असतील असं जाहीर केलं होतं.