लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला अनेकजण आपण केलेल्या कामांचा किंवा भविष्यातील योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहचवत आहे. मुंबईमधील महत्वाच्या लढतीपैकी एक असणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा विरुद्ध सध्याचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यामध्ये ही लढत होणार असून दोन्ही उमेदवारांनी एकमेकांविरुद्धात दंड थोटपले आहे. विशेष म्हणजे देवरा यांच्या प्रचारासाठी चक्क देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी मैदानात उतरले आहेत. देवरा यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी देवरांची स्तृती करताना दिसत आहेत. ‘दक्षिण मुंबईसाठी मिलिंदच सर्वोत्तम आहे’ असे मत अंबानी यांनी या व्हिडीओत मांडले आहे.

मलिंद देवरा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये दक्षिण मुंबई म्हणजे व्यवसाय असे समिकरणच असल्याचे म्हटले आहे. आपल्याला पुन्हा एकदा मुंबईमध्ये उद्योग व्यवसाय आणण्याची गरज असून तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे असं देवरा यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये दक्षिण मुंबईतील छोटी पानाची टपरी चालवणाऱ्यांपासून ते मुकेश अंबानींसारख्या अब्जाधीशांचे मालक असणाऱ्यांपर्यंत लहान-मोठ्या सर्वच उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये दक्षिण मुंबईमध्ये सहा वेगवेगळ्या उद्योजकांनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, कोटक ग्रुपचे उदय कोटक, लघुउद्योजक क्रिश रामणानी, किराणामालाचे दुकान चालवणाऱ्या सुषमा ताई, दुध डेअरीचे मालक फारकुद्दीन चित्तलवाला, पानाची टपरी चालवणारा राजू अशा लोकांनी मते मांडली आहेत. या व्हिडीओमध्ये बोलताना मुकेश अंबानी यांनी ‘मलिंदने १० वर्ष दक्षिण मुंबईचे नेतृत्व केले आहे. मलिंदला दक्षिण मुंबईतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सखोल ज्ञान आहे,’ असे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना मुंबईमधील छोट्या तसेच मोठ्या उद्योगांनी मुंबईची भरभराट झाली असल्याने आपण अधिक तरुण लोकांना येथे नोकऱ्यांची संधी देण्याची गरज असल्याचे अनिल अबांनी म्हणाले आहेत.

‘मिलिंदला मुंबईकरांच्या समस्या जाणतो. त्याच्या कुटुंबानेही अनेक वर्षांपासून मुंबईकरांसाठी काम केले आहे. मिलिंद खऱ्या अर्थाने मुंबईशी असलेले कनेक्शन दाखवतो’, असं मत कोटच्या उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे. या व्हिडीओच्या शेवटी मिलिंद म्हणजे उद्योग व्यवसाय, मलिंद म्हणजे नोकऱ्या असंही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच याच मुद्द्यावरुन देवरांनी दक्षिण मुंबईतील मतदारांना साद घातली आहे.