मी भाजपाची निष्ठावान कार्यकर्ती आहे, माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका एकच आहे असं आता साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहिल असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं होतं. मात्र यावर भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत नाही असं म्हणत या वक्तव्याची निंदा केली. एवढंच नाही साध्वी प्रज्ञासिंह यांना यासंबंधी पक्ष स्पष्टीकरण मागेल असे म्हणत झापले. त्यानंतर ताळ्यावर येत माझी आणि पक्षाची भूमिका वेगळी नाही असं म्हटलं आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून साध्वी प्रज्ञावर टीका होऊ लागली. प्रियंका गांधी यांनी ट्विट करत महात्मा गांधी यांचा खुनी देशभक्त? हे राम! असे लिहून त्यांचा संताप व्यक्त केला. तर काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली. साध्वी प्रज्ञा यांच्यावर चौफेर टीका केल्यानंतर अखेर त्यांनी ताळ्यावर येत माझी आणि पक्षाची भूमिका वेगळी नाही असं म्हटलं आहे.

भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तो वाद शमत असतानाच साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून नव्या वादाला सुरूवात करून दिली. मात्र पक्षाने झापल्यावर माझी आणि पक्षाची भूमिका वेगळी नाही असं त्या म्हटल्या आहेत.