काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आपली आश्वासनं न पाळल्याचा आरोप केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींची आज खिल्ली उडवली जात असल्याचं म्हटलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांची नेहमी खिल्ली उडवत असत पण आता पाच वर्षांनी ते अशा पद्धतीने खिल्ली उडवताना दिसत नाही. कारण आज देश त्यांची खिल्ली उडवत आहे. ‘, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे. पंजाबमधील फरीदकोटमध्ये ते बोलत होते.

‘पंतप्रधानांना वाटतं की फक्त एकटा माणूस देश चालवू शकतो. पण असं नसून लोक देश चालवत असतात’, असा टोला राहुल गांधींनी लगावला. याआधी मंगळवारी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते सतत नेहरु-गांधी कुटुंबावर टीका करत असताना आपण प्रत्यारोप करताना कधीही नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही असं आश्वासन दिलं. आपण नरेंद्र मोदींचा प्रेमाने पराभव करु, पण कधीच त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही असं राहुल गांधींनी सांगितलं.

‘नरेंद्र मोदी फार द्वेषाने बोलतात. त्यांनी माझे वडील, आजी आणि आजोबांचा अपमान केला. पण मी आयुष्यात कधीही त्यांच्या कुटुंबावर, आई, वडिलांवर टिप्पणी करणार नाही. मृत्यू पत्करेन, पण त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करणार नाही’, असं राहुल गांधी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं होतं.

‘कारण मी आरएसएस किंवा भाजपाचा माणूस नाही, पण काँग्रेसचा आहे. त्यांच्या द्वेषाला मी प्रेमाने उत्तर देईन. गळाभेट घेत, प्रेमाने आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव करु’, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.