राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच नाव न घेता बुधवारी केली. शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरीत ते बोलत होते. यावेळी भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री बापट म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस ही काय पार्टी आहे काय? ही तर पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे’. शरद पवार आणि अजित पवार यांच नाव न घेता गिरीश बापट यांनी हा टोला लगावला. राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस संपत चालली आहे. जो आजोबांच्या आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज मान्य करणार नाही. त्यामुळे राजकारण ज्यांना व्यवसाय आहे त्यांना हद्दपार करण्याची संधी आहे. परंतु, ही संधी गमावली तर तुम्हा आम्हाला इतिहास माफ करणार नाही, असंही बापट म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी लादली आहे. हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असं म्हणत गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला.