मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीला होणारच, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. राज ठाकरेंसोबत यापूर्वी झालेल्या वादांवरही छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी बुधवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून यात त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या वादावर भाष्य केले आहे. राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. आता राज ठाकरेंनी नाशिकमध्ये सभा घेतल्याने याचा फायदा समीर भुजबळांना होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ म्हणतात,  राज ठाकरेंच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर ती मतं सैरभैर झाली होती. यातील काही मतं शिवसेना तर काही मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण राज ठाकरेंनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
राज ठाकरेंच्या सभेचे वेगळेपण असून त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण असते, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंचे कौतुक केले आहे.

बहुजन वंचित आघाडीवरही त्यांनी टीका केली आहे. वंचित आघाडीने उमेदवार दिले नसते तर ती मतं काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळाली असती. पण आता ही तूट मनसे आणि शेतकरी संघटनेच्या मतांनी भरुन निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे आणि मी एकमेकांवर टीका केली. निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर असे आरोपप्रत्यारोप होतात. पण यामुळे वैयक्तिक संबंध तोडले जातात, असे नाही. मी शिवसेनेविरुद्ध बोललो होतो. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यातील लढाई सर्वांना माहित आहे. पण यामुळे माझ्या मनात बाळासाहेबांविषयी असलेला आदर कमी झाला नाही. आमच्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम होता. तसेच संबंध राज आणि उद्धव ठाकरेंसोबतही आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले.