29 September 2020

News Flash

नऊ हजार मतदारांवर फुली

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील ९ हजार ५०० हून अधिक मतदारांच्या मतदार यादीतील नावे वगळल्याचा (डिलिट) शिक्का मारण्यात आला आहे

डोंबिवलीतील वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावावर मारलेले शिक्के.

भगवान मंडलिक

मतदारयाद्यांच्या अभ्यासाअंती उघड;  निवासी, हयात असताना वगळल्याचा आरोप

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील ९ हजार ५०० हून अधिक मतदारांच्या मतदार यादीतील नावे वगळल्याचा (डिलिट) शिक्का मारण्यात आला आहे. अनेक मतदार या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत. कार्यकर्त्यांवर भिस्त असलेल्या राजकीय मंडळींना या विषयाचा सुगावा नसल्याने ही मंडळी सुशेगाद आहेत. अनेक वर्षे मतदारांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांने आताच्या मतदार याद्यांचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आणला आहे.

डोंबिवलीतील मिलिंद करंदीकर ३० वर्षांपासून डोंबिवली विधानसभा, लोकसभा, महापालिका निवडणुकांसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांचा अभ्यास करतात. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांना डिसेंबर २०१८ पर्यंत अद्ययावत असलेल्या मतदारांच्या याद्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात देण्यात आल्या. करंदीकर यांनी डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांची तपासणी सुरू केली. मतदार भाग क्रमांक यादीप्रमाणे मतदार त्या इमारतीत, त्या क्रमांकाच्या सदनिकेत राहतो का, तसेच त्या सदनिकेतील सर्व मतदारांची नावे यादीत आहेत की नाहीत. मतदार मयत असेल तर त्याचे नाव यादीतून वगळले का, अशी तपासणी त्यांनी सुरू केली. त्यानंतर धक्कादायक माहिती करंदीकर यांच्या हाती लागली.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात तीन लाख ४१ हजार ७३० मतदार आहेत. या याद्या मिलिंद करंदीकर यांनी मागील दोन दिवसांत पडताळल्या. त्यात त्यांना नऊ हजार ५०० हून अधिक मतदारांच्या नावावर वगळल्याचा शिक्का मारल्याचे दिसले. यामधील बहुतांशी मतदार डोंबिवली निवासी आणि हयात आहेत.

करंदीकर यांनी गेल्या महिन्यात स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना झालेला प्रकार सांगितला. संबंधित अधिकाऱ्याने गटस्तर अधिकारी या मतदारांच्या घरी गेले असतील त्यावेळी ते घरात नसतील किंवा त्यांची माहिती देण्यास शेजाऱ्यांनी नकार दिला असेल. पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला असेल. या मतदारांनी आपली इत्थंभूत माहिती निवडणूक कार्यालयात दिली असेल तर त्यांची नावे वगळल्याचा शिक्का असला तरी सुधारित यादीत ती मतदार म्हणून नोंद होऊन येऊ शकतात, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मयतांची नावे यादीत आहेत. या मयतांची माहिती, त्यांची कागदपत्र गट स्तर अधिकाऱ्यांना कोणी दिली, या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले.

१ एप्रिल २०१९ ची सुधारित मतदार यादी राजकीय पक्षांना निवडणूक विभागाकडून मिळाली. या यादीत मागील यादीतील कोणत्याही सुधारणा न होता वगळलेल्यांची नावे कायम असल्याचे करंदीकर यांच्या निदर्शनास आले. मयतांची नावे कायम आहेत. फक्त नवीन मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट आहेत, असे आढळून आले आहे. डोंबिवलीतील मध्यमवर्गीय मतदारांची नावे सर्वाधिक वगळली आहेत. झोपडपट्टय़ांमधील एकाही नावावर वगळल्याचा शिक्का मारण्यात आलेला नाही.

यादीतील घोळ

१ डोंबिवली पूर्वेतील  मेघा भवन इमारतीत फक्त मालक व इतर तीन जण राहतात. मात्र यादीत ३२५ मतदार राहत असल्याचे अनुक्रमांकासह म्हटले आहे. या मतदारांची पडताळणी केली असता ते फडके रस्त्यावरील नूतन विशाल, टिळक रस्ता, मोतीलाल नेहरू पथ, मुखर्जी रस्ता भागात राहत असल्याचे आढळले.

२ टिळक रस्त्यावरील गांधी कुटीरमध्ये राहणाऱ्या गांधी कुटुंबातील हयात असणाऱ्या मतदारांच्या नावावर ‘वगळल्याचा’ शिक्का मारला आहे. याच कुटुंबातील आजी काही वर्षांपूर्वी मयत झाल्या आहेत. त्या यादीत मतदार असल्याचे दर्शविले आहे.

३ कमल प्रसाद इमारतीत आईचे निधन झाले आहे. त्यांचे नाव यादीत, मात्र मुलगी आणि नातीचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. यादी भाग क्रमांक २०९ मध्ये १३४४ एकूण मतदार आहेत. या यादीतील ५२५ नावांवर वगळण्यात आल्याचा शिक्का मारला आहे. या यादीतील अनेक मतदार हयात आहेत.

यादीतील नावावर ‘डिलिटेड’ शिक्का मारला असेल ते मतदार मतदान करू शकणार नाहीत. वगळल्याचा शिक्का असलेले मतदार नव्याने अर्ज भरून पुन्हा मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज करू शकतात. ही नियमित प्रक्रिया आहे. यावर कोणावर कायमस्वरूपी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते.

-राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी

‘बीएलओ’ कर्मचाऱ्यांची निष्क्रियता

याद्या पडताळणीची कामे पालिका कर्मचारी, शिक्षकांना देण्यात आली होती. कामे सांभाळून कर्मचारी नाइलाजाने ओझे पडल्यासारखी ही कामे करत होते. काहींनी याद्यांची घरबसल्या पडताळणी केली. शेजाऱ्यापाजऱ्यांना विचारून ही कामे केली. त्यामधून या चुका झाल्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:55 am

Web Title: nine thousand voters removed from list
Next Stories
1 ‘यंत्रमागातील वीज अनुदानाबाबत निवडणुकीनंतर निर्णय’
2 भाजप जिंकावा ही काँग्रेसची इच्छा
3 युती सरकारकडून जाती-पातीचे राजकारण
Just Now!
X