महेश सरलष्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता मोहिमे’चा नारा दिला असला तरी, त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळते. वाराणसी असंख्य मंदिरे आणि छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांनी भरलेले शहर आहे. मंदिरांच्या अवतीभोवतीचा परिसर आणि अरुंद गल्ल्यांमधील कचरा वाराणसीसारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहराला गालबोट लावतो. या वर्षी स्वच्छता सर्वेक्षणात वाराणसीची ७०व्या क्रमांकावर घसरण झालेली असून गेल्या वर्षी वाराणसी २९व्या क्रमांकावर होते.

गेल्या वर्षी केंद्रीय पर्यटनमंत्री अल्फॉन्सो यांनी वाराणसीला भेट दिली होती. या भेटीनंतर वाराणसी हे गलिच्छ शहर असल्याची टिप्पणी अल्फॉन्सो यांनी केली होती. काशी विश्वनाथाचे मंदिर आणि गंगाकिनारी असलेले ऐंशीहून अधिक घाट हे वाराणसीचे वैशिष्टय़. काशी विश्वनाथ मंदिराच्या भोवतीच्या सर्पाकार चिंचोळ्या गल्ल्यात प्लास्टिकच्या वस्तू, कुल्हड, खाव्याचे पदार्थ, वेगवेगळे खाद्यपदार्थ, भांडय़ांची, सोन्या-चांदीची, कापडांची, साडय़ांची अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. खाली दुकाने त्यावर घरे. इथल्या फारच कमी गल्ल्या स्वच्छ या प्रकारात मोडतात.

मंदिराला वेटोळे घालणाऱ्या गल्ल्यांतून बाहेर आले की, तुलनेत मोठे रस्ते दुकानदारांनी आणि भक्तांनी भरून गेलेले असतात. काकड आरतीपासून मध्यरात्रीपर्यंत भक्तांचा ओघ मंदिराकडे असल्यामुळे फुलमाळा आणि प्रसाद यांचे सांडलेले अवशेष जागोजागी पाहायला मिळतात.

दुकानांभोवती दिवसाअखेर कचरा वाढत जातो. हा सगळा परिसर गजबजलेला आणि अरुंद असल्याने दिवसाच्या कुठल्याही वेळेला इथे गर्दी असते आणि दुचाकी-तीन चाकी वाहनांच्या गर्दीत चालणे मुश्कीलच असते. मंदिराच्या छट्टाद्वाराच्या बाजूला चित्रा नावाची ऐतिहासिक जुनी इमारत आहे. चित्राच्या समोर मधुबालाची आई राहात होती असे सांगतात. चित्राच्या आवारात कापडाची, पानाची, खाण्या-पिण्याची दुकाने आहेत.

काशी विश्वनाथाला लागून ग्यानव्यापी मशीद असल्याने मंदिराचा संपूर्ण परिसर संवदेनशील आहे. आता या भागात नवा कॉरिडोर निर्माण करण्याचे काम सुरू असल्याने सरस्वती फाटक, मणिकर्णिका द्वार, छट्टाद्वार अशा विविध द्वारांवर आणि सर्पाकार गल्ल्यांमध्ये पोलीस बंदोबस्त असतो. गंगानदीच्या मणिकर्णिका घाटापासून थेट मंदिरापर्यंतचा मोठय़ा पट्टय़ाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून भक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. हा पट्टा विकसित करण्यासाठी हजारभर घरे जमीनदोस्त करण्यात आली असून या प्रत्येक घरात असलेली मंदिरेही पाडण्यात आली आहेत. सर्पाकार गल्ल्यांमध्ये असलेल्या घरांत कळसाची मंदिरे होती.

अनेक घरांमध्ये शिवलिंगाची पूजा केली जात असे. ही मंदिरे आणि शिवलिंग गाढली गेल्याचा आरोप कॉरिडोरविरोधक करतात. कॉरिडोरविरोधात आंदोलन झाल्यानंतर मंदिरांची पाडापाडी थांबली. त्यामुळे अनेक मंदिरे उभी आहेत पण, त्यांच्या भोवती सिमेंटचा आणि मातीचा ढीग साठलेला दिसतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत या कॉरिडोरच्या कामाचा शुभारंभ केला होता. हा कॉरिडोर पूर्ण झाला की, विश्वनाथ आणि गंगा यांची थेट भेट होईल. हा कॉरिडोर म्हणजे राष्ट्रकार्य असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

कडक उन्हाळ्यात गंगेचे पात्र आकुंचन पावले असले तरी होडीतून भक्तांची सैर सुरू असते. पैलतीरावर गंगेचे पाणी स्वच्छ असल्याचा समज असल्याने अनेक दक्षिणात्य भक्त पलीकडे स्नान करून पावन होतात. गंगा तुलनेत स्वच्छ झाल्याचे होडीवाल्यांचे म्हणणे आहे. पूर्वी गंगेत कुठेही मृतदेह तरंगताना दिसत असत. आता मृतदेह दिसत नाहीत, पण मृतदेह गंगेत बुडवणे थांबलेले नाहीत.

अस्सी घाटासहित अनेक घाट स्वच्छ दिसतात. अस्सी घाटापासून मोदींनी वाराणसींच्या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. मधल्या घाटावर फक्त  प्राणीमात्र आंघोळ करतात. त्यामुळे गंगाकिनारी म्हशी डुंबत असतात. मणिकर्णिका घाटावर अंत्यविधी होत असल्याने हा घाट अस्वच्छ असतो. याच मणिकर्णिका घाटापासून नवा कॉरिडोर बनत असून गंगा विश्वनाथाच्या भेटीला जाणार आहे.

जागोजागी वाहतूक कोंडी

काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून जसजसे दूर जावे तसे वाराणसी शहर तुलनेत स्वच्छ दिसायला लागते. रथयात्रा वगैरे काही भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली वा तिला शिस्त आली असे नव्हे. त्यामुळे रस्ता रुंद झाला असला तरी वाराणसीमध्ये सगळीकडे वाहतूक कोंडी पाहायला मिळते.