आमचे बंधूच पवारांची लाचारी आणि चमचेगिरी करत आहेत. पार्थ सरस की रोहित असे विचारल्यावर पवार महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार? असा प्रश्न विचारत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पाथर्डी या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत पंकजा मुंडे यांनी ही टीका केली.

डॉक्टर सुजय विखे पाटील बोलेपर्यंत मला थोडी शंका होती. पण त्यांनी एकदम उत्तम भाषण केलं. विरोधक आमच्या उमेदवारांची पात्रता काय असं विचारतात? पण आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहेत असं पंकजा मुंडेंनी म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

आमच्यावर आक्षेप घेणाऱ्या दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. आमचे विरोधक म्हणतात हे बाहेरचे आले, यांना कळतं का बाहेरचं कोण आहे? आम्ही इथेच जन्मलो आणि लहानाचे मोठे झालो. डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण दोन वाक्यंही धड बोलता न येणाऱ्यांची पात्रता विचारत नाही. पार्थ पवार आणि रोहित पवार या दोघांमधला कोणता नेता चांगला आहे असा प्रश्न आमच्या भावाला विचारला, त्यावेळी आमच्या बंधूराजांनी उत्तर दिलं पार्थ किंवा रोहितपेक्षा मला पवार महत्त्वाचे आहेत. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातली घराणेशाही दिसत नाही का? तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवार घरातलेच आहेत हे दिसत नाही आणि इकडे विखे पाटील यांची घराणेशाही तुम्हाला दिसते का? असाही प्रश्न पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला.

अहमदनगरमध्ये सगळीकडून घुसखोरी सुरु आहे. राम शिंदे यांच्या मतदारसंघातही बारामतीची घुसखोरी सुरु आहे. तिथे यांना बाहेरचा कोणी दिसत नाही. प्रियंका गांधी चालतात त्यांना कोणी विचारत नाही वाड्रा आडनाव का लावत नाही? आम्ही इथलाच उमेदवार दिला आहे आमचा उमेदवार काय चीन किंवा पाकिस्तानमधून आलेला नाही असाही टोला पंकजा मुंडेंनी लगावला.