देशाला राजा, महाराजा नको तर चौकीदार हवा आहे जो त्यांची सेवा करु शकेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी म्हणाले. ते ‘में भी चौकीदार’ मोहिमेला पाठिंबा देणाऱ्यांना संबोधित करत होते. २०१४ साली लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि देशाची सेवा करायची संधी दिली. नवीन जबाबदारी स्वीकारल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांपासून देशाच्या संपत्तीचे रक्षण करण्याचा मी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न केला असे मोदी म्हणाले.

चौकीदार हा काही गणवेशाशी संबंधित नाही. ती एक भावना आहे. मी माझ्या राजकीय भवितव्याचा विचार केला असता तर मोदी बनलो नसतो. मी माझ्या फायद्या-तोटयाचा विचार करुन निर्णय घेतले असते तर देशाला मोदीची गरज नसती असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

ज्यांनी देशाच्या संपत्तीची चोरी केली त्यांना त्याची आज झळ सोसावी लागत आहे. जे देशाची संपत्ती घेऊन पळाले त्यांना प्रत्येक रुपया परत करावा लागेल. मी या लोकांना तुरुंगाच्या जवळ आणले आहे. काही जण जामिनावर बाहेर आहेत तर काही कोर्टात तारखा मागत आहेत असे मोदी म्हणाले.

जर एका कुटुंबाच्या चार पिढया तेच आश्वासन देत असतील आणि दिलेले आश्वासन पूर्ण करत नसतील तर लोकांनी विचार केला पाहिजे. काही लोकांना हा देश आणि सरकार त्यांची पिढीजात संपत्ती वाटत होती. त्यांना चायवाला या देशाचा पंतप्रधान झाला हे पचवायला कठीण जात आहे असे मोदी म्हणाले.

‘में भी चौकीदार’ मोहिमेला पाठिंबा देणाऱ्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममधून संवाद साधला. भव्य मंचावरुन पंतप्रधान मोदी उपस्थितांबरोबर संवाद साधला. जवळपास पाच हजार नागरीक या कार्यक्रमाल उपस्थित होते. याच कार्यक्रमात मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधला.