पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिदांचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. मोदींनी आपल्या भाषणात अशा प्रकारे आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे सांगत आयोगाने मोदींना क्लिनचीट दिली आहे. काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारादरम्यान, महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत पहिल्यांदा त्यानंतर इतर काही सभांमध्ये नवमतदारांना मतदान करताना शहिदांची आठवण ठेवावी असे सांगितले होते. तसेच त्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे जाहीर आवाहनही त्यांनी केले होते. तसेच उत्तर प्रदेशात प्रचारादरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सैन्याला मोदीकी सेना असे संबोधले होते.

मोदी-शाह यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. मोदी आणि शाह शहिदांचा प्रचारासाठी वापर करीत असल्याचा आरोप करीत या दोघांवर कारवाई करावी यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातचे दरवाजेही काँग्रेसने ठोठावले होते. मात्र, याबाबत कारवाईसाठी निवडणूक आयोग असल्याने सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेपास नकार देत चेंडू आयोगाच्या कोर्टात टाकला होता.

मात्र, आता निवडणूक आयोगानेही मोदींना क्लिनचीट दिल्यानंतर काँग्रेस पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.