पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व हिमालयासारखे आहे. इतर लोकांशी त्यांची तुलनाही होऊ शकत नाही असे म्हणत योग गुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इतर कुणी उभेही राहू शकत नाही. देशाला राजकीय स्थैर्य, विकास आणि बळकटी आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. २०१९ ला त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी भारताच्या जनतेने दिली पाहिजे असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांचे देशाच्या राजकारणात काय आणि किती मोठे योगदान आहे हे सगळ्या देशाला ठाऊक आहे. त्यांच्या शेजारी इतर नेत्यांना उभे केले की समजू शकते की कोणाची काय हाईट आणि फाईट आहे असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. खरंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाबा रामदेव हे प्रचारापासून लांब का गेले अशी चर्चा सुरु होती. कारण मागच्यावेळी त्यांनी भाजपाला पाठिंबाच दिला नव्हता तर भाजपाचा प्रचारही केला होता. मात्र तूर्तास त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र आपल्या वक्तव्यातून राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व हिमालयासारखे आहे. त्यांच्या तुलनेत इतर नेते उभेही राहू शकत नाहीत. भारताच्या जनतेने त्यांना २०१९ ला पुन्हा एकदा निवडून देत आणखी एक संधी दिली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आज बाबारामदेव यांनीही मतदानाचा अधिकार बजावला त्यानंतर ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.