राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एकत्र येत प्रचार सुरु केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं एकही आश्वासन पाळलेलं नाही. पंतप्रधान म्हणाले होते की आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ. सबका साथ सबका विकास हे आमचं उद्दीष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देऊ, मात्र आज देशात काय परिस्थिती आहे हे दिसतेच आहे असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

इतकंच नाही तर आम्ही हिंदू दहशतवाद हा मुद्दा आम्ही मागे टाकला आहे. काही गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर आम्ही हा शब्द आणला होता तरीही हा शब्द प्रचलित करण्यात आमचा हात नाही असेही शिंदे यांनी म्हटले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, विकास, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी या सगळ्या विषयांवर न बोलता 9 वर्षांपूर्वीचे जुने विषय उकरून काढत आहेत. कारण त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भीती वाटते आहे त्यांना ते घाबरतात असे शिंदे यांनी म्हटले आहे.

हिंदू दहशतवाद हा शब्द काँग्रेसने आणला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका सभेत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला होता. त्या टीकेला आज ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी उत्तर दिले आहे. आता या उत्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतान दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केल्यानंतर आता काँग्रेसनेही त्यांना उत्तर दिले आहे.