प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले वक्तव्य महिला म्हणून मला धक्कादायक वाटते आणि त्याचे खंडण करण्यासाठी सत्तेतील एकहीजण पुढे येत नाही, हे अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महिला मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण सुरक्षित राहावे म्हणून महाराष्ट्रातील ज्या योद्धय़ाने पाठीवर नाहीतर छातीवर गोळी घेतली, अशा योद्धय़ाला महिला शाप देते. यानिमित्ताने आज अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आठवण येते. त्यांच्याकडून अंधश्रद्धा निमूर्लनाविरोधात आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिशा घेऊन काम केले. त्यामुळे शाप यासारख्या गोष्टी धक्कादायक आहेत, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे खंडण करायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा असून त्यांच्याकडे महिला म्हणून न्याय मागते आह. प्रज्ञासिंह साध्वी असू शकते का? याचाही विचार आपण करायला हवा. तसेच त्यांना साध्वी म्हणणे माझ्या मनाला काही पटत नाही.