19 September 2020

News Flash

मी उमेदवार : पालघर

भाजप सरकारच्या काळात स्थानिकांना विस्थापित करण्याचे प्रकल्प आल्याने जनतेत रोष आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यतील विनाशकारी प्रकल्प रोखणार

बळीराम जाधव, बविआ

(संग्रहित छायाचित्र)

विद्यमान खासदारांनी केलेल्या कामांबाबत तुमचे मत काय?

पालघरमधील खासदारांच्या कामाबद्दल बोलण्यासारखे काही नाही. कारण कामे केलेलीच नाही तर बोलणार काय? नागरिकांनी मागील लोकसभा निवडणुकीत आणि नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दोनदा भाजप उमेदवारांना संधी दिली. मात्र नागरिक प्रचंड नाराज आहेत. उलट भाजप सरकारच्या काळात स्थानिकांना विस्थापित करण्याचे प्रकल्प आल्याने जनतेत रोष आहे.

पारंपरिक शिटी निशाणी जाऊन रिक्षा आल्याचा फटका बसतोय का?

आमची शिटी निशाणी जाऊन रिक्षा निशाणी आली. पण याने काहीच फरक पडला नाही. कारण पूर्वी शिटी निशाणी ही एकटय़ा बहुजन विकास आघाडीची होती. आता रिक्षा निशाणी आमच्या सर्व पक्षांची झाली आहे. ही रिक्षा निशाणी आमच्या पथ्यावर पडली असून आमचे सर्व सहयोगी पक्ष रिक्षा निशाणी घरोघरी पोहोचवत आहे. सर्व रिक्षा संघटनांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमची शिटी निशाणी घालविणाऱ्या विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे.

तुम्हाला मते का द्यावीत?

आम्ही पाठपुरावा करून जिल्ह्यात पाइप गॅस आणला आहे. बहुजन विकास आघाडीची वसई-विरार महापालिकेत सत्ता आहे. बविआने वसईत कायापालट केला आहे. वसईत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे केली आहेत. आम्ही आश्वासनांवर मते मागत नाहीत तर केलेल्या विकासकामांवर मते मागत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचा सहयोगी पक्षा आहे. या काँग्रेस आघाडीने आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रात अनेक विधायक कामे केली आहे. कुठलेही विद्वेषाचे राजकारण नाही. केलेली विकास कामे हीच आमच्या जमेची बाजू असून पुढील विकासकामे करण्यासाठी आम्हाला मते द्यवीत.

प्रमुख समस्या सोडविण्यासाठी काय नियोजन आहे?

हा मतदारसंघ शहरी, सागरी, तसेच जंगल पट्टय़ात वसलेला आहे. स्थानिक शेतकरी, मच्छीमार, आदिवासी आणि भूमिपुत्रांच्या समस्या आहेत. देशातील सर्वात जास्त प्रकल्प पालघर जिल्ह्यात येत असून ते स्थानिकांना विस्थापित करणारे आहेत. आम्ही जनतेच्या बाजूने असल्याने या सर्व विनाशकारी प्रकल्पांना विरोध आहे. प्रस्तावित वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, बडोदा एक्स्प्रेस महामार्गाला जनतेचा विरोध आहे. या प्रकल्पांना विरोध करून स्थानिक जनतेला उद्ध्वस्त होऊ देणार नाही.

संधी मिळाली तर काय कामे करणार?

अनेक वर्षांपासून रखडेलला डहाणू-नाशिक रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार. जी महिला स्पेशल उपनगरी गाडी रद्द झाली होती ती आम्ही पुन्हा सुरू केली. आता महिला प्रवाशांसाठी अधिक विशेष गाडी  सुरू करण्याचे प्रयत्न केले जातील. तेच काम पालघरसाठीही करू. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे. तसेच मच्छीमार, शेतकरी यांच्या उद्य्ोगांना चालना दिली जाईल.

केंद्राकडून विकासनिधी मंजूर करून घेतला

राजेंद्र गावित, शिवसेना

 

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती कामे केली?

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी त्यांच्या कार्यकाळात विरार ते डहाणू रोडदरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण तसेच रस्त्यांच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी केंद्राकडून मंजूर करून आणला होता. माझ्या आठ ते नऊ महिन्यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीत वसई येथे पारपत्र कार्यालयासाठी (पासपोर्ट) मंजुरी मिळविणे, लांब पल्ल्याच्या गाडय़ांना पालघर येथे थांबा देणे, मारंभपाडा ते दातिवरे असा पाच किलोमीटर लांबीच्या सागरी उड्डाणपूल मंजूर करणे, सातपाटी येथे धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर करणे तसेच मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी व इतर अनेक समस्या सोडवण्यासाठी कामे केली.

 रेल्वे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणांसाठी काय योजना आहे?

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्ग उभारण्यात यावा याकरिता सर्वेक्षण करणे, जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण झाल्याने पालघर रेल्वे स्थानकाचा दर्जा उंचावणे, डहाणू रोडपर्यंतच्या उपनगरीय गाडय़ांची सेवा वाढवणे, पालघर मुख्यालयाला चौपदरी रस्त्याद्वारे जोडणे, खारेकुरण-मुरबे आणि नवापूर-दांडीदरम्यान सागरी उड्डाणपूल बांधून तारापूर अणुशक्ती केंद्रासाठी पर्यायी आपत्कालीन मार्ग निर्माण करणे, पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत वेगवेगळ्य महत्त्वाचा रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे.

लोकांनी तुम्हाला मते का द्यावीत?

२००४ पासून मी या भागात काम करत असून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा करत आहे. राज्यमंत्रिपदाच्या तसेच खासदारकीच्या काळात अनेक विकासकामे केली आहे. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीत मी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी, मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मी सर्वसामान्य माणसांची संपर्कात आहे व पुढेही राहीन.

पुढील पाच वर्षांत आपण कोणती कामे करणार आहात?

पालघर येथे तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात आरोग्याच्या सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी दोनशे खाटांच्या रुग्णालयाची उभारणी कारण्यासाठी प्रयत्न, विरार-वसई महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवणे, रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवणे, भूमिपुत्रांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना व पाठबळ देणे तसेच पर्यटन विकास साधून येथील नागरिकांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देईन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 12:22 am

Web Title: prevent the destructive project of the district
Next Stories
1 निवडणूक बहिष्कार मागे!
2 मीरा-भाईंदरमध्ये सेनेची मदार उत्तर भारतीय, जैन मतदारांवर
3 दोन खासदार असूनही वाडा सुविधांपासून वंचित
Just Now!
X