अभिनेता सनी देओलला लोकसभेच्या गुरूदासपूर जागेवरून भाजपाने उमेदवारी दिली आहे. यावर टीका करताना काँग्रेस नेत्याने ताळतंत्र सोडलं आहे. नरेंद्र मोदी सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. जनतेला आता बदल हवा आहे. सनी देओल सोडून द्या सनी लिओनी भाजपात आली तरीही आमचे वादळ रोखू शकणार नाही अशी टीका काँग्रेसचे होशियारपूरचे उमेदवार राजकुमार चब्बेवाल यांनी ही टीका केली आहे. चब्बेवाल यांच्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. गुरुदासपूरमधून भाजपाने सनी देओल यांना तिकिट दिले आहे. त्यावरूनच आता काँग्रेस नेते चब्बेवाल यांनी सनी देओल असो की सनी लिओनी आम्हाला रोखू शकणार नाही असे म्हटले आहे.

भाजपाला पराभव समोर दिसू लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. पंजाबमध्ये तीन जागांसाठी भाजपाला उमेदवार शोधावे लागत होते. सनी देओलच काय सनी लिओनीला समोर आणले तरीही काँग्रेसचीच लाट आहे असेही चब्बेवाल यांनी म्हटले आहे. २०१४ मध्ये गुरुदासपूरची जागा भाजपाने अभिनेते विनोद खन्ना यांना दिली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड निवडून आले. आता पुन्हा एकदा काँग्रेसने गुरुदासपूरमधून सुनील जाखड यांनाच तिकिट दिले आहे. त्यामुळे गुरुदासपूरमध्ये सनी देओल विरूद्ध सुनील जाखड असा सामना होणार आहे.

सध्या लोकसभा निवडणुकांचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. आता त्यामध्ये आणखी एका वादग्रस्त वक्तव्याची भर पडली आहे. आता याबाबत भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.