भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. अब की बार ३०० पार अशी घोषणा अमित शाह यांनी दिली होती. ही घोषणा देऊन ते थांबले नाहीत तर ही संख्या प्रत्यक्षात गाठूनही दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विजयाचं श्रेय जातं तसंच ते अमित शाह यांनाही जातं. अमित शाह यांना मोदींचा वजीर म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होऊ शकतो अशीही चर्चा रंगली आहे. जर अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला तर अमित शाह यांची जागा कोण घेणार याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरू झाली आहे.

भाजपाने ३०३ जागा मिळवत लोकसभा निवडणुकीतलं अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. अशात आता या विजयाचं श्रेय अमित शाह यांनाही जातं. त्यांना महत्त्वाचं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अमित शाह यांना केंद्रीय मंत्रिमंडळातलं अगदी महत्त्वाचं पद दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा आहे. तसं ते दिलं जाणार की नाही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपातल्या तीन दिग्गज नेत्यांनी अमित शाह यांना महत्त्वाचं स्थान केंद्रीय मंत्रिमंडळात असेल अशी शक्यता वर्तवली आहे. कारण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम निश्चितच वाखाणण्याजोग आहे त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेल्यास त्यांच्या जागी कोणाची निवड होईल याची चर्चा सध्या भाजपाच्या गोटात रंगताना दिसते आहे.

भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे विरोधकांचं अक्षरशः पानिपत झालं आहे. दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेतील. त्यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असेल याची चर्चा रंगतेच आहे. शिवाय अमित शाह यांच्याबाबतही चर्चा रंगते आहे. अमित शाह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून पक्षाचे धोरण आणि एकंदरीत दिशाच बदलली. त्यामुळे आता अमित शाह यांना मंत्रिपद दिल्यास त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार यावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.