पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, असा आरोप भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या शाह यांच्या रोड शो दरम्यानच्या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पराभव दिसत असल्याने ममता बॅनर्जींचा जळफळाट होत असल्याची टीकाही यावेळी शाह यांनी केली.

संध्याकाळी साडेसात वाजता ही हिंसाचाराची घटना घडली. त्यावेळी कॉलेज बंद झाल्याने गेटही बंद होते. हिंसाचारावेळी भाजपाचे कार्यकर्ते या गेटच्या बाहेर होते, मध्ये पोलीस होते मग तरीही हे गेट कोणी खोलले? तसेच आतमध्ये दोन खोल्यांदरम्यान असलेल्या पुतळ्याची तोडफोड कशी काय झाली? या कॉलेजवर तृणमुलचे प्रशासन आहे. त्यामुळे ही तोडफोड ममतांच्या कार्यकर्त्यांनीच केली असून त्यांचेच लोक आतून दगडफेकही करीत होते, असा दावा यावेळी शाह यांनी केला.

शाह म्हणाले, बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जातोय. लोकसभेच्या सहा टप्प्यात बंगालसोडून देशात कुठेही हिंसाचार नाही, केवळ इथेच झाला आहे. भाजपा देशभरात निवडणूक लढवत आहे. तर तृणमुल काँग्रेस केवळ बंगालमधील ४२ जागा लढवत आहे. त्यामुळे माझ्या रोड शो दरम्याचा हिंसाचार हा तृणमुल काँग्रेसनेच घडवून आणला आहे. पराभवाच्या भीतीने आणि व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी हे सर्व सुरु आहे तसेच पोलीस हिंसाचारावेळी मुकपणे सर्व काही पाहत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

रोड शो पूर्वी आमची पोस्टर्स फाडली तरी भाजपा शांत राहिली. रोड शो सुरु झाल्यानंतर दोन ते अडीच लाख लोक जमा झाले होते. दरम्यान, तीन वेळा हल्ला झाला. तिसऱ्या वेळी जोरदार दगडफेक आणि केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले, असा दावा यावेळी अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी घटनेचे काही फोटोही सादर केले.