19 January 2020

News Flash

मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याबद्दल तृणमूलची तक्रार

वृत्तवाहिन्यांच्या वार्ताकनामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप

वृत्तवाहिन्यांच्या वार्ताकनामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ भेटीचे वृत्तवाहिन्यांनी केलेले वार्ताकन  व प्रसारण हे आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी  यांच्या केदारनाथ व बद्रीनाथ भेटीचे वाहिन्यांनी चित्रण केले तसेच त्यांनी त्यावेळी केलेली वक्तव्येही दाखवली, हे अनैतिक असल्याचे पक्ष प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार १७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता संपला असताना मोदी यांच्या केदारनाथ व बद्रीनाथ यात्रेचे वार्ताकन करण्यात आले. दोन दिवस त्यांचे तेथील कार्यक्रम राष्ट्रीय व स्थानिक वाहिन्यांवरून दाखवण्यात आले. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे तृणमूलने म्हटले आहे.

मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या कुहेतूनेच हे प्रसारण करण्यात आले, असा आरोप ओब्रायन यांनी केला असून पंतप्रधान मोदी यांच्यावर निवडणूक आयोग काहीच कारवाई करीत नसल्याचे म्हटले आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना लोकशाही प्रक्रि येतील डोळे व कान असलेल्या निवडणूक आयोगाने अंध व बहिऱ्याची भूमिका घेतली. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या केदारनाथ – बद्रीनाथ दौऱ्याच्या अनैतिक प्रक्षेपणाची दखल घेऊन कारवाई करावी, असे ओब्रायन यांनी म्हटले आहे.

मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी बद्रीनाथ येथे पूजाअर्चा केली त्याचेही चित्रीकरण दाखवण्यात आले. दरम्यान  मोदी यांनी आदर्श आचारसंहिता लागू असतानाही केदारनाथ- बद्रीनाथला भेटीची परवानगी दिल्याबाबत निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. त्यांनी मिनिटामिनिटाला केलेल्या कृतींचे प्रक्षेपण करून मतदारांवर  प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या चित्रीकरणात मोदी. मोदी . अशा घोषणाही ऐकू येत होत्या. याचाही उल्लेख तक्रारीत केला आहे.

पंतप्रधान मोदी बद्रिनाथ चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय उत्तराखंड दौऱ्यात रविवारी, दुसऱ्या दिवशी बद्रिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हिमालयाच्या परिसरातील केदारनाथ मंदिरात जवळपास २० तास व्यतीत केल्यानंतर मोदी बद्रिनाथला पोहोचले.

चारधाम यात्रेतील एक स्थळ असलेल्या बद्रिनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात मोदी यांनी पूजा केली. ते तेथे २० मिनिटे होते, अशी माहिती बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे प्रमुख मोहन प्रसाद थाप्लियाल यांनी दिली.

तेथे मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोदी यांना भुर्जपत्रावरील शुभेच्छापत्र भेट दिले. माना येथील ग्रामस्थांनी शाल-श्रीफळ देऊन मोदी यांचा सत्कार केला. मोदी यांनी बद्रिनाथ मंदिराच्या आवारात फेरफटका मारून स्थानिक आणि भाविकांना हात उंचावून अभिवादन केले. बद्रिनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात मंदिराच्या आवाराचा विस्तार करून तेथील दूरध्वनी सेवा सुधारण्याची मागणी केली आहे.

First Published on May 20, 2019 12:27 am

Web Title: trinamool congress comment on narendra modi
Next Stories
1 मतदान टाळण्यासाठी आदल्या दिवशीच बोटाला शाई
2 लोकसभा निवडणुकीने वृत्तवाहिन्यांना तारले
3 सातव्या टप्प्यात ६१ टक्के मतदान
Just Now!
X