News Flash

व्ही.एच.अच्युतानंदन यांचे जनमानसातील स्थान अढळ

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हयात असलेले एकमेक संस्थापक सदस्य व्ही.एस.अच्युतानंदन या वयातही प्रचार करत आहेत

(संग्रहित छायाचित्र)

विष्णू वर्मा

स्टार प्रचारक नसले तरीही ‘माकप बंडखोर’ ९५ व्या वर्षी सक्रिय

व्ही. एस. आले, पलक्कड येथे माकपच्या सभास्थळी उपस्थित असलेल्यांची चर्चा सुरू होते. त्यानंतर फटाक्यांच्या पाठीमागे आतषबाजीत सुरू असतानाच छोटय़ा व्यासपीठावर अच्युतानंदन यांचे आगमन होते. मग त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होते. हे दृश्य आहे ९५ वर्षीय व्ही.एस.अच्युतानंदन यांच्या सभेचे.

या वयात अपवादात्मक दृष्टय़ा व्यक्ती राजकारणात सक्रिय राहतात. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हयात असलेले एकमेक संस्थापक सदस्य व्ही.एस.अच्युतानंदन या वयातही प्रचार करत आहेत. वयोमानानुसार गती मंदावली असली तरी भाषणातील आक्रमकपणा कायम आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच ही निवडणूक महत्त्वपूर्ण असल्याची आठवण ते करून देतात. मग संघ व भाजपवर टीकास्त्र सोडतात. हे जातीयवाद पसरवत असल्याचा व्ही.एस. यांचा आरोप आहे. केरळमध्ये भाजपला लोकसभेची एकही जागाजिंकता आलेली नाही. गेल्या वेळी थिरुअनंतपुरममधील जागा ते थोडक्यात हरले.

यंदा शबरीमला संघर्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपने एक-दोन जागा मिळतील अशी अपेक्षा ठेवली आहे. शबरीमलाच्या मुद्दय़ावर व्ही.एस. भाजप व काँग्रेसला सवाल करतात. त्यांना स्त्री-पुरुष समानता हवी आहे की नको? यावर मोठे लेख त्यांचे नेते लिहितात. मग श्ॉमेलॉनलाही लाजवेल अशी भूमिका कशी बदलतात असा प्रश्न ते विचारतात. पलक्कडचे माकप खासदार राजेश हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात आहेत. त्यांचे चिन्ह सांगून व्ही.एस. भाषण संपवतात.

रोज एक ते दोन सभा

वयोमानानुसार व्ही एस रोज एक ते दोन सभा घेतात. त्याही सूर्यास्तानंतर असतात. अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचा समावेश नाही. डाव्या लोकशाही आघाडीच्या प्रचार फलकांवर त्यांचे छायाचित्र नाही. पक्षात त्यांच्यावर बंडखोर हाच शिक्का बसला. पक्षात त्यांचे महत्त्व कमी करण्यात आले आहे. व्ही.एस. यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जाणारे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या प्रतीमेभोवती प्रचार केंद्रित आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मात्र व्ही.एस. तितकेच लोकप्रिय आहेत. पलक्कडच्या सभेला उपस्थित असलेल्या प्रिया या गृहिणीने व्ही.एस. यांच्याइतका प्रामाणिक राजकारणी सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. तर सुकुमारन या कार्यकर्त्यांने आजच्या साम्यवादी नेत्यांची व्ही.एस. यांच्याशी तुलनाच करता येणार नाही, असे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 1:25 am

Web Title: vh achuthanandan place of public opinion endless
Next Stories
1 पुणे मतदारसंघ भाजपला अनुकूल?
2 लक्षवेधी लढत : उत्तर गोवा
3 किस्से आणि कुजबुज
Just Now!
X