पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत आपण पाठवत असलेल्या कुर्ता आणि मिठाईबद्दल सांगितल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच भडकल्या आहेत. एका प्रचारसभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी आपण नरेंद्र मोदींना माती आणि दगडापासून तयार केलेली मिठाई पाठवणार आहोत, जी खाताना त्यांचे दात तुटतील असं सांगत आपला संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी आजही आपल्याला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात अशी माहिती दिली होती. नरेंद्र मोदींनी अशाप्रकारे राजकीय वापर केल्याने ममता बॅनर्जी मात्र चांगल्याच भडकल्या आहेत.

‘नरेंद्र मोदी याआधी पश्चिम बंगालमध्ये कधी आले नाहीत, आणि आता त्यांना बंगालमधून मतं हवी आहेत. आम्ही त्यांना बंगालमधील रसगुल्ला देऊ. आम्ही मातीपासून मिठाई तयार करु आणि त्यात दगडांचा वापर करु. ज्याप्रमाणे लाडू तयार करताना त्यात काजू, बेदाणे वापरतात त्याऐवजी दगडांचा वापर करु. यामुळे त्यांचे दात तुटतील’, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय प्रश्नांऐवजी खासगी आयुष्याबाबत मनमोकळी उत्तरं दिली. मोदी म्हणाले, राजकारणातही माझे अनेक मित्र आहेत. विरोधी पक्षातील लोकांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील मला वर्षातून तीन ते चार वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून त्या देखील वर्षातून एक- दोनवेळा मिठाई पाठवू लागल्या, असे त्यांनी सांगितले होते.

 

‘2014 मध्ये भाजपाला दोन जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला मिळणार आहे’, असं याआधी ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. भाजपाला यावेळी एकही जागा मिळणार नाही असा विश्वास ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी दोन्ही हातांनी पश्चिम बंगालमध्ये लाडू वाटण्याचं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होऊ शकणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.