– डॉ. अभिजित कदम

2019 च्या लोकसभा निवडणुकीने खुप काही शिकवले. खुप नवीन लोकांसोबत जोड़ला गेलो, खुप जुने लोक तुटले. खरेतर हे सगळं झालं फेसबुक आणि व्हॉट्स अप वर. म्हणजे तस हे आभासी जग. पण ही लोकं आभासी नव्हती. मी या लोकांना भेटलोय, बोललोय पण लिखाण, बोलणं, वागणं यातून माणूस समजतो या भ्रमातून या निवडणुकीमुळे बाहेर पडलो.

माझ्या मते 90 टक्के लोकांचा राजकीय व्ह्यू फिक्स असतो. केवळ 10 टक्के लोकं दुसऱ्याचं मत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतात. ज्यांचे राजकीय व्ह्यू फिक्स आहेत, त्यांनी देखील आपली राजकीय मत चिंतनाने बनवलेली नसतात. या 90 टक्के लोकांपैकी खुप कमी जणांना फॅक्ट्स माहीत असतात किंवा जाणून घ्यायची इच्छा असते. मग या लोकांनी आपली राजकीय मतं कशाच्या जिवावर फिक्स केलेली असतात हा खूप मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधताना काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या.

राजकीय मतं बनवताना सर्वात जास्त प्रभाव पाड़तो तो जाहिरातींचा. जाहिरात म्हणजे केवळ अधिकृत जाहिरात नाही. जाणून बुजून पेरल्या गेलेल्या बातम्या हा जाहिरातबाजीचा अभद्र चेहरा आहे. आणि या सगळ्यामागे आहे मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया आणि सोशल मीडिया हा या अभद्र चेहऱ्याचा उत्तरोत्तर कट्टर आणि भयावह प्रकार आहे.

या मीडिया मधून या निवडणुकीच्या वेळी सर्रास खोटं पसरवलं गेले आणि वेळो वेळी तुमच्या आमच्या डोळ्या समोर आणि कानावर हे खोटं पड़त राहील याची काळजी घेतली गेली. लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची सध्याची परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे. वेळोवेळी इतरांना उपदेश देणाऱ्या या चौथ्या स्तंभाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. व्यावसायिक नितीमत्तेचा बळी देत व्यावसायिक प्रगती साधणारा व्यवसाय या एका वाक्यात या चौथ्या स्तंभाची व्याख्या करावी एवढी परिस्थिती वाईट आहे.

या मीडिया मधुन आलेल्या बातम्या नंतर आयटी सेलने सारांश काढून पुढे फिरवल्या. आणि मग त्याच व्हाट्स अॅपवरून व्हायरल झाल्या. पिछेसे आया आगे ढकेल दिया, या भारतीय मनोवृत्ती मुळे कोणीही त्याच्या सत्यतेची तपासणी करण्याच्या भानगडीमधे पडले नाही. मला विशेष या गोष्टीचे वाटते की स्वतः आजारी पडल्यानंतरचे लक्षण गूगल करुन आजाराचं स्वतःचं निदान करणारी भारतीय मानसिकता या आयटी सेलच्या बातम्यांच्या सत्या असत्याबाबत मात्र गूगल करुन घ्यायच्या मनःस्थिति मधे नव्हती.

हा आरोप खुप गंभीर आहे. परंतु आपली राजकीय समज खुप तोकड़ी आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद म्हणजे काय हे ही बहुतांश लोकांना माहीत नाही. खरोखर नागरिक शास्त्र केवळ 10-20 मार्कासाठी अभ्यासल्याचा हा परिणाम आहे का? सिव्हिक सेन्स आणि राइट्स यांचा गंध नसलेली आपण जगातली मोठी लोकशाही आहोत, दुर्दैवाने…

या निवडणुकीने भारतीय म्हणुन आपल्याला काय दिलं असेल तर पराकोटी चा द्वेष. समर्थक आणि विरोधक या दोन गटांत सर्रास विभागणी. आणि राष्ट्रवादाची अत्यंत संकुचित व्याख्या हे या निवडणुकीचं देणं असेल. समर्थक आणि विरोधक एकमेकांच्या राजकीय निष्ठेची स्पेस मान्य करण्यास तयार नव्हते आणि या शिवाय एक तिसरा वर्ग आहे, ज्यांना या दोन्ही वर्गवारीत मोडण्यात इंटरेस्ट नाहीये हे देखील मान्य करण्यास तयार नव्हते.

मुळात आपण समाजशील प्राणी आहोत. या निवडणुकीनंतर प्रत्येकाकड़े संशयाने पाहण्याची वृत्ती कालांतराने कमी होईल ही. निसर्गतः विसरण्याचं आणि माफ करण्याचं वरदान मिळाल्यामुळे सगळे वाद विसरून ही जाऊ, परंतु तो ओरखडा मनात कुठेतरी कायम राहील…. अगदी कायमचा……

(लेखक व्यवसायानं उरळीकांचन येथील बालरोगतज्ज्ञ आहेत)