मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं असा दावा माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केला आहे. भाजपासह चला किंवा तुम्हाला आतमधे टाकू असं त्यांना सांगण्यात आलं होतं असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र या दाव्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“खोटं बोला पण रेटून बोला ही भाजपाची पॉलिसी आहे. मात्र मिंधे ज्यांना आपल्या डोक्यावर बसवलं आहे त्यांची पॉलिसी आहे खोटं बोला पण रडून बोला. तसंच मातोश्रीवर येऊन रडले होते.” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड

जून २०२२ मध्ये सरकार पडलं. २१ जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं. २१ जून ते २९ जून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार हे आधी सुरत, त्यानंतर गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्याला गेले. ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी याच दिवशी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला होता. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या एक महिना आधी काय घडलं होतं ते आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

हे पण वाचा- “मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवलं”, रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांचं मोठं विधान!

२० मे २०२२ ला एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते

“एकनाथ शिंदेंना ऑफर दिली गेली होती कॅश की जेल? त्यांचं कॅशचं गोडाऊन प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडलं. त्यांना सांगण्यात आलं येताय बरोबर की आत टाकायचं? मग एकनाथ शिंदे त्यांची दाढी खाजवत रडायला लागले. एकनाथ शिंदे २० मे २०२२ ला वर्षा बंगल्यावर आले होते. उद्धव ठाकरेंना त्यांनी रडत सांगितलं, मला धमकावलं जातं आहे. जेलमध्ये जाण्याचं हे वय नाही मी काय करु साहेब? तुम्ही काहीतरी करा, भाजपासह चला. हे आम्हाला आतमधे टाकतील असं रडगाणं झालं होतं.” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदय सामंत काय म्हणाले?

आदित्य ठाकरे काय बोलत आहेत त्याने काही फरक पडणार नाही. वैयक्तिक पातळीवर टीका करताना वैर असेल तरी भान ठेवलं पाहिजे. आदित्य ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही हे ठाऊक आहे असं उदय सामंत म्हणाले.