scorecardresearch

“…तर नरकापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवेन”, अरविंद केजरीवाल यांचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, “मी त्यांना सोडणार नाही”!

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी स्वत: हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

“…तर नरकापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवेन”, अरविंद केजरीवाल यांचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, “मी त्यांना सोडणार नाही”!
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Photo : Indian Express)

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधल्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार पंजाबमध्ये पुढील महिन्यात १४ फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. गेल्या काही महिन्यांत पंजाबमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहाता ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल होऊ लागला आहे.

…तर २४ तासांच्या आत निलंबन!

आपनं पंजाब निवडणुकीसाठी उमेदवारीची तिकिटं विकल्याचा आरोप इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला आहे. “एकही तिकीट विकलं गेलेलं नाही. जर तुम्ही कुणीही पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवू शकलं की अमुक एका व्यक्तीने तिकीट विकलं आणि अमुक एका व्यक्तीने ते खरेदी केलं, तर २४ तासांच्या आत त्याला पक्षातून काढून टाकेन”, असं केजरीवाल म्हणाले आहेत.

मी काहीही सहन करू शकतो, पण…

भ्रष्टाचाराविषयी अरविंद केजरीवाल यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी काहीही सहन करू शकतो, पण भ्रष्टाचार सहन करू शकत नाही. जर हे सिद्ध झालं की तिकिटाची खरेदी-विक्री झाली आहे, तर मी त्या दोघांना फक्त पक्षातून निलंबित करून थांबणार नाही, त्यांचा नरकापर्यंत पिच्छा पुरवेन. मी त्यांना सोडणार नाही. जेलमध्ये पाठवेन”, असं ते म्हणाले.

आमच्यावर सगळेच आरोप करतायत…

दरम्यान, यावेळी बोलताना केजरीवाल यांनी सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला. “सध्या ही फॅशन झाली आहे. सत्याचा मार्ग काट्यांचा असतो. सगळे पक्ष, लोकं आमच्यावर चिखलफेक करत आहेत की तिकिटं विकली. जर कुणी आपवर चुकीचे आरोप केले, तर त्याला देखील आम्ही सोडणार नाही. त्याच्यावरही गुन्हे दाखल करू, त्यांनाही तुरुंगात टाकू. जर तुम्ही सिद्ध केलं की तिकिट खरेदी-विक्री झालीये, तर मी त्यांना जेलमध्ये टाकेन. पण इतर कुणी खोटेनाटे आरोप केले, तर त्यांनाही जेलमध्ये टाकेन. त्यांना सोडणार नाही मी”, असं केजरीवाल म्हणाले.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. एकूण ११७ जागांसाठी पंजाबमध्ये मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी असेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2022 at 17:55 IST

संबंधित बातम्या