पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टक्केवारी आणि हिंसाचाराची घटना
लोकसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात ५९ जागांसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले, तर पश्चिम बंगालमध्ये आठ जागांसाठी ८० टक्क्य़ांवर मतदान झाले, तसेच तेथे भाजप उमेदवारावर हल्ला करण्यात आला.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ८, तर दिल्लीतील सर्व सात व झारखंडमधील चार जागांसाठी मतदान झाले. दिल्लीतील सात जागांपैकी ईशान्य दिल्लीत सर्वाधिक मतदान झाले, तर नवी दिल्ली मतदारसंघात कमी मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा यंदा जोरदार संघर्ष आहे. तेथे रविवारी आठ मतदारसंघांत उत्साहात मतदान झाले. मतदारांच्या रांगा बहुतांश ठिकाणी होत्या. झारखंडमध्ये चार जागांसाठी चार वाजेपर्यंत ६४.४६ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशात पाच वाजेपर्यंत ६० टक्के मतदान झाले. राजगढमध्ये सर्वाधिक साठ टक्के मतदान झाले, तर प्रतिष्ठेच्या भोपाळ मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले. भोपाळमधील काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यांचे नाव राघोगड मतदारसंघात आहे. भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमधील रिव्हेरा टाऊन परिसरात मतदानाचा हक्क बजावला. उत्तर प्रदेशात १४ जागांसाठी ५ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान झाले होते.
भाजप उमेदवारावर दोन वेळा हल्ला
कोलकाता : पश्चिम बंगालच्या घाटाल लोकसभा मतदारसंघात रविवारी सहाव्या टप्प्यात मतदान सुरू असताना भाजपच्या उमेदवार आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर दोन वेळा हल्ला करण्यात आला. घोष सकाळी भाजपच्या मतदान प्रतिनिधीला केशपूर भागातील एका मतदान केंद्रात घेऊन जात असताना महिलांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला. यात घोष यांना किरकोळ जखमा झाल्या. यानंतर, केशपूरमधील दोगचिया येथील दुसऱ्या मतदान केंद्रावर हेराफेरी करण्यात आल्याचे कळल्यामुळे घोष या केंद्राला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यावर बॉम्ब फेकण्यात आले, तसेच दगडफेक करण्यात आली. यात त्यांचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनांबाबत पश्चिम मिदनापूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान, मला थांबवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने हेतुपुरस्सर केलेला हा प्रयत्न आहे. त्यांनी माझ्यावर हल्ला केला व मी जखमी झाले, असा आरोप भारती घोष यांनी केला.
मोदींकडून प्रचारात द्वेषाचा वापर – राहुल
पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात द्वेषाचा वापर केला, तर आम्ही मात्र प्रेमाचा वापर केला, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी लोकसभेसाठी मतदान केल्यानंतर सांगितले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही प्रतिस्पर्धी पक्षांत झुंज झाली आहे, पण यात प्रेमाचाच विजय होईल असा आपला विश्वास आहे.