उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ भाजपाने जिंकली आहे. राज्यातील अनेक लोकप्रिय जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांचा पराभव केला आहे. यामध्ये लखनऊच्या सरोजिनी नगरच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे भाजपचे उमेदवार राजेश्वर सिंह यांनी बाजी मारली आहे. त्यांना एक लाख ६ हजार ८६१ मते मिळाली आहेत. त्याचवेळी समाजवादी पक्षाचे उमेदवार प्राध्यापक अभिषेक मिश्रा यांच्या बाजूने ७० हजार मते पडली आहेत. अशा प्रकारे राजेश्वर सिंह यांनी अभिषेक मिश्रा यांचा जवळपास ३६ हजार मतांनी पराभव केला आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सरोजिनी नगरमधील सुमारे ४८ टक्के मतदारांनी राजेश्वर सिंह यांना मतदान केले आहे. तर अभिषेक मिश्रा यांना ३१.४४ टक्के लोकांनी मतदान केले आहे. एकूण दोन लाख २७ हजार ७०२ मतदानाची मोजणी झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर बसपचे मोहम्मद जलेश खान यांना २५ हजार ७२८ मते मिळाली आहेत.
राजेश्वर सिंह हे ईडीचे सहसंचालक आहेत. त्याचवेळी अभिषेक मिश्रा आयआयएम अहमदाबादमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांचे वडीलही नागरी सेवेत होते. राजेश्वर सिंग यांचे वडील रण बहादूर सिंग हे भारतीय पोलीस सेवेत होते, तर अभिषेक मिश्रा यांचे वडील जयशंकर मिश्रा उत्तर प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी होते. काँग्रेसने रुद्र दमन सिंह यांना तिकीट दिले होते, तर जलेश खान बसपकडून निवडणूक लढवत होते.
योगी सरकारमधील विद्यमान मंत्री स्वाती सिंह आणि त्यांचे पती दयाशंकर सिंह यांच्यातील वादामुळे सरोजिनी नगरची जागा चर्चेत होती. दोघांना येथून निवडणूक लढवायची होती. स्वाती सिंह यांची एक कथित ऑडिओ क्लीप देखील समोर आली होती. ज्यामध्ये त्यांनी दयाशंकरवर त्यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पती-पत्नीच्या भांडण भाजपाला निवडणुकीत पक्षाला नकोसे वाटल्याने येथून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्याचेही एक कारण असल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने निवडणुकीपूर्वी स्वाती सिंह यांना तिकीट देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यापूर्वी त्यांचे पती दयाशंकर सिंह या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण बसपा सुप्रीमो मायावती यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे पक्षाला त्यांची हकालपट्टी करावी लागली. नंतर स्वाती सिंह यांना तिकीट देण्याचा निर्णय झाला. भाजपाने त्यांचा महिला उमेदवार म्हणून प्रचार केला, तोही कामी आला. निवडणुकीत स्वाती सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या अनुराग यादव यांचा सुमारे ३४ हजार मतांनी पराभव केला होता.