Poonam Mahajan : प्रमोद महाजन यांची हत्या १८ वर्षांपूर्वी झाली आहे. त्यांची हत्या का झाली? त्यामागे काय कारण होतं? याबाबत पूनम महाजन यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पूनम महाजन यांनी ‘माझा कट्टा’ या मुलाखतीत उपस्थिती दर्शवली होती. प्रमोद महाजन यांनी फाईव्ह स्टार कल्चर आणल्याची टीका झाली. मात्र त्यांची दूरदृष्टी खूप मोठी होती. प्रमोद महाजन यांची हत्या त्यांच्या भावानेच केली. त्या सगळ्याबाबत पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी भाष्य केलं आहे.

पूनम महाजन काय म्हणाल्या?

प्रमोद महाजन यांना रुग्णालयात ठेवलं होतं ते १२ ते १३ दिवस मी कधीही विसरु शकत नाही. बाबा गेले पण ते व्यक्तिमत्व प्रखर होत गेलं हे मी अनुभवलं. बाबा जाणं म्हणजे घरातला वटवृक्ष दिसत असतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला प्रमोद महाजन होऊन दिल्लीला जावंसं वाटतं. प्रमोद महाजन होण्याची इच्छा अनेकांमध्ये मी पाहिली आहे. असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) म्हणाल्या.

ते पिस्तुलही प्रमोद महाजन यांचंच

प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या चर्चा झाल्या. कारण सनसनी निर्माण करायची असते. प्रमोद महाजनांवर एका माणसाने गोळ्या झाडल्या हे ठीक आहे. मात्र ती गोळीही त्यांच्याच पैशांची होती, बंदुकही त्यांच्याच पैशांची होती, कदाचित त्या माणसाच्या अंगावरचे कपडे (प्रवीण महाजन) हे पण प्रमोदजींच्या पैशांचेच असू शकतात. पण बाबांना मारण्याचं डोकं फक्त एका माणसाचं असू शकत नाही. मी हे आज नाही खूप वर्षांपासून बोलते आहे. हे सत्य कधीतरी शोधलं पाहिजे. असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन भावूक

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन टोकाचे वाद होते का?

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यातले संबंध खरंच टोकाचे झाले होते? असं विचारलं असता पूनम महाजन म्हणाल्या, “कुठल्याही खुनाच्या मागे कारण काय ते शोधलं जातं. त्यावेळी कोर्टात जे सांगितलं गेलं त्यावरुन हे कळलं की इतकी वर्षे सांभाळलं तरीही अजून सांभाळलं जावं असं वाटत होतं. माझा मुलगा २० वर्षांचा झाला आहे त्याला मी सांगते की तुझी तू कमाई करायला शिक. पण अशा कारणाने असं कुणी करत असेल का? भांडणातून एखादी गोष्ट ट्रिगर होऊ शकते का? तुम्ही (प्रवीण महाजन) प्रमोदला दादाही म्हणत नव्हतात. सरळ प्रमोद अशीच हाक मारत होतात. तुम्ही प्रमोदशी वादही घालत असायचा. काही महिन्यांपूर्वी बोललेल्या माणसावर दोन महिन्यांत इतका राग कसा येऊ शकतो? तो राग कुणी वाढवला? हे शोधणं महत्त्वाचं आहे. केनेडींवर अजूनही चर्चा होते. कदाचित प्रमोद महाजन यांच्या हत्येचं कारण कळायला वेळ लागेल. पण मला वाटतं की माझ्या हयातीत हे कारण समजलं पाहिजे.” असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी म्हटलं आहे.

प्रमोद महाजन यांच्या हत्येचं षडयंत्र कशासाठी?

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र कशासाठी आखलं गेलं होतं? असं विचारलं असता, पूनम महाजन म्हणाल्या, “प्रमोद महाजन यांना राजकारण आणि समाजकारणातून बाजूला करण्यासाठी त्यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं. आपल्याला अंदाज असतोच ना. मी काही पत्रकारिता केलेली नाही. पण आपण राजकारणात असल्याने कुणाचे हेवेदावे असतात, ते माहीत असतंच.” असं पूनम महाजन ( Poonam Mahajan ) यांनी म्हटलं आहे.

प्रमोद महाजन यांनी फाईव्ह स्टार कल्चर आणलं?

महालक्ष्मी या ठिकाणी भाजपाचं अधिवेशन होतं. त्यावेळी प्रमोद महाजन यांच्या कानावर सतत मोबाइल फोन होता. त्यावेळी एका वृत्तपत्राने बातमी केली होती की पंचतारांकित संस्कृती प्रमोद महाजन यांनी भाजपात आणली. त्याबाबत प्रमोदजी असं म्हणाले होते आज माझ्या हातातला फोन आणि त्यावर तुम्ही बोलत आहात दहा वर्षांनी गुरं हाकणारा माणूस असेल ना त्याच्याही हातात फोन दिसेल. आज आपण ही वस्तुस्थिती अनुभवत आहोत. तसंच ज्यांनी प्रमोद महाजनांबाबत पंचतारांकित संस्कृतीच्या गोष्टी पसरवल्या त्यांच्याकडे एक नाही दोन मोबाइल फोन असतात एक डेटासाठी आणि दुसरा कॉलिंगसाठी असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.