उत्तर प्रदेश, पंजाब, गोवासह पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पंजाब व गोवा राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी, उत्तराखंड राज्यातही एकाच टप्प्यात १५ फेब्रुवारीस मतदान होईल. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ४ मार्च तर दुसऱ्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात होतील. विशेष म्हणजे या सर्व राज्यांची मतमोजणी ११ मार्च रोजी होतील. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या निवडणुकीत १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आजपासून पाच राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पाच राज्यातील ६९० जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा- ११ फेब्रुवारी, दुसरा टप्पा- १५ फेब्रुवारी, तिसरा टप्पा- १९ फेब्रुवारी, चौथा टप्पा- २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा- २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा-४ मार्च तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. निवडणूक आयोगाने यंदा राज्यांसाठी खर्चाची मर्यादी ही वेगळी ठेवली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब व उत्तराखंडसाठी २८ लाख रूपये तर मणिपूर आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी २० लाख रूपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पाच राज्यांसाठी १.८५ लाख मतदान केंद्र असतील, अशी माहिती झैदी यांनी दिली. यंदा निवडणूक आयोगाने मतदाराचा फोटा असलेली मतपत्रिका तयार केली आहे.

तत्पूर्वी, निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी निवडणूक आयोगाने या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मणिपूरमध्ये नागा बंडखोरांकडून होत असलेल्या हिंसाचार व कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सुरक्षा, मतदान यंत्र आणि आचारसंहितचे कठोर पालन करण्यावरही चर्चा झाली. गृह मंत्रालय या पाच राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान सुमारे ८५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करणार आहे. त्याचबरोबर विविध १०० सुरक्षा कंपन्यांची मदतही घेतली जाणार आहे. यामध्ये राज्य सशस्त्र बल आणि केंद्रीय राखीव बटालियनचाही समावेश असेल.