Nilesh Lanke : भाजपाने उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्याचं काम केलं. तसेच आमच्या शरद पवार साहेबांचे कुटुंब दोन गटात विभागण्याचं पाप केलं. त्यामुळे भाजपाला जागा दाखवण्याची हीच वेळ आहे, अशी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार निलेश लंके यांनी केली आहे. तसेच त्यांनी कोरगावमधून संदीप वर्पे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं असं आवाहनही जनतेला केलं आहे. निलेश लंके यांनी कोपरगावमध्ये आज एबीपी माझा वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य केलं.

नेमकं काय म्हणाले निलेश लंके?

“कोपरगावची विधानसभा निवडणूक ही राज्यात रंगतदार निवडणूक होणार आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे. आज कोपरगावची परिस्थिती बघितल्यानंतर मला माझ्या निवडणुकीची आठवण झाली. मीसुद्धा २०१९ मध्ये मी धनदांडग्याविरोधात निवडणूक लढवली होती. यात जनतेने माझा बाजुने कौल दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदा कोपरगावमध्ये होणार आहे”, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar : Video : “तुला कोणी लंकेंनी पाठवलं का?”, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यावर भर सभेत अजित पवार संतापले; नेमकं काय घडलं?

“संदीप वर्पे राज्यातला दुसरा निलेश लंके होणार”

“या निवडणुकीनंतर संदीप वर्पे राज्यातला दुसरा निलेश लंके होणार आहे. कोपरगावच्या जनतेला मला एवढंच सांगायचं की कोपरगावमध्ये शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते उमेदवार आहेत, असं समजून त्यांनी मतदान करावं आणि संदीप वर्पे यांना निवडून आणावं”, असेही आवाहनही त्यांनी केलं.

हेही वाचा – Sujay Vikhe Patil : नगरमध्ये राजकारण तापलं, सुजय विखेंचा निलेश लंकेंना इशारा; म्हणाले, “टायगर अभी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपाला जागा दाखवण्याची हीच वेळ”

पुढे बोलताना त्यांनी भाजपा-शिंदे गटाच्या सरकारवर जोरदार टीकाही केली. “राज्यातल्या शिंदे सरकारने शेतकरी किंवा बेरोजगारांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्य जनतेचा कोणताही विचार न करणारे हे सरकार आहे. त्यांनी केवळ आमच्या उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचण्याचं काम केलं. आमच्या शरद पवार यांचं कुटुंब दोन गटात विभागण्याचं पाप केलं. त्यामुळे त्यांना जागा दाखवण्याची हीच वेळ आहे”, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली.