अमरिंदर सिंग काँग्रेसच्या विजयाचे ‘कॅप्टन’ ; शिरोमणी अकाली दल-भाजपचा धुव्वा

पंजाबसारखे पूर्ण राज्य जिंकण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या मनसुब्यांना शनिवारी मोठा झटका बसला. याउलट उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काँग्रेसला कॅ. अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये ११७ पैकी ७७ जागा जिंकून घवघवीत यश मिळवून दिले. लोकसभेतील नीचांकी कामगिरीनंतर काँग्रेसने जिंकलेले हे पहिलेच राज्य आहे. योगायोगाने पंचाहत्तराव्या वाढदिवशीच कॅप्टन सिंग यांना हे विजयाचे बक्षीस मिळाले आहे.

दुसरीकडे केजरीवालांना पंजाब जिंकण्यात आलेल्या अपयशाने शिरोमणी अकाली दल आणि भाजपने सुटकेचा नि:श्वास टाकला. दिल्लीत नाकीनऊ  आणणाऱ्या केजरीवालांकडे पंजाबची सूत्रे जाऊ  नयेत, यासाठी भाजपने देव पाण्यात ठेवले होते. अगदी शेवटच्या क्षणी भाजप व अकाली दलाने काँग्रेसला मदत केल्याची चर्चा होती. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने कॅ. अमरिंदर सिंग यांचे आवर्जून अभिनंदन केले.

प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारविरोधात असलेल्या तीव्र जनमताने पंजाबमध्ये बदलांचे वारे घुमत होते. दिल्लीकडे पाठ फिरवून केजरीवालांनी सर्व ताकद पणाला लावून पंजाब जिंकण्याचा पण केला होता. पंजाबी युवा वर्ग आपकडे झुकल्याचेही जाणवत होते. मध्यंतरी घेतलेल्या बहुतेक कल चाचण्यांमध्ये आपला घवघवीत जागा दिल्या जात होत्या. बदलांवर स्वार होऊ पाहणाऱ्या केजरीवालांचे वादळ घोंघावत असल्याचे चित्र वाटत होते. ९० जागांपेक्षा एकही जागा कमी येणार नसल्याचे स्वत: केजरीवाल छातीठोकपणे सांगत होते.

अगदी मतदानोत्तर चाचण्यांमध्येही  आप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण प्रत्यक्षात कॅ. अमरिंदर सिंगांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागा पटकाविल्या. ‘आप’ला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. खासदार भगवंत मान (जलालाबाद) यांच्यासह त्यांचे बहुतेक मोहरे धारातीर्थी पडले. याउलट अकाली दल व भाजपने १८ जागा मिळवून अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली. ३० टक्के मतेही त्यांनी घेतली.काँग्रेसच्या विजयाचे वैशिष्टय़ म्हणजे माळवा, माझा आणि दोअबा या तीनही प्रांतात उत्तम कामगिरी. माळवा हा केजरीवालांचा बालेकिल्ला मानला जात होता.

आप दुसऱ्या स्थानावर

  • अकाली दल (१५) आणि भाजपला (३) अपेक्षेपेक्षा जास्त जागा. मतदानोत्तर चाचण्यांनुसार दोन्ही पक्षांना दोन अंकी संख्या गाठणे अवघड होते. दोघांची बेरीज आपच्या (२०) जवळ जाणारी आहे.
  • मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल (लंबी), उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल (जलालाबाद), आंतरराष्ट्रीय तस्कर म्हणून शिक्का मारलेले सुखबीरसिंगांचे मेहुणे बिक्रमजित मजिठिया (मजिठा) या अकाली दलाच्या तीन सर्वोच्च नेत्यांना चांगल्या मताधिक्यांनी विजय मिळाला.
  • भावी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासाठी शनिवारचा दिवस कडू-गोड ठरला. पतियाळा या त्यांच्या परंपरागत मतदारसंघातून ते एकतर्फी विजयी झाले. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल जे.जे. सिंग यांचा पराभव केला. पण त्यांना लंबीमध्ये मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्याकडून हार पत्करावी लागली.

काँग्रेसला दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल मी पंजाबमधील जनतेचा आभारी आहे. काँग्रेसचे सरकार पंजाबच्या सर्वतोपरी विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. जनतेने शिरोमणी अकाली दल आणि आपला नाकारल्याचेच निकालावरून स्पष्ट होते. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

 – अमरिंदर सिंगमुख्यमंत्रिपदाचे दावेदार, पंजाब

पंजाबमधील पराभव आम्हाला मान्य आहे. अमरिंदर सिंग यांचे अभिनंदन. अकाली दलकडून पराभवाच्या कारणांबाबत विचार करण्यात येईल. सत्तेत नसलो तरी पंजाबच्या जनतेच्या विकासासाठी कायम आग्रही भूमिका घेऊ.

प्रकाश सिंग बादल, माजी मुख्यमंत्री